मनी चिरंतर उरले....

 

एकाच जन्मात आयुष्याने कित्येक जन्माचे रंग दाखवले,

प्रत्येक नात्याने येथे मजला अमानुषपणे छळले...

दुःखाच्या एका वळणावरून दुसरीकडे मोर्चा मी वळवला 

तरी प्रत्येक नात्याने सारीपाठ माझा उधळला...

आपल्याच माणसांच्या चालीने आयुष्य बनले जणू सतरंज, 

काळया-पांढऱ्या मनाच्या लोकांना कधी न कळले माझे 

अंतरंग...

सतरंजची ती धूर्त चाल इथे प्रत्येक जणच खेळला, 

त्यांच्या चालीमध्ये मात्र जीव माझा गुदमरला...

द्वेष, असूया, मत्सर हे पाचवीलाच पुजलेले,

जिवाभावाच्या माणसाने या सगळ्याचा कळस गाठला...

माझा त्याच्यावरचा अतिविश्वास नडला, 

त्याच विश्वासाचा त्यांने चांगला पांग फेडला...

विश्वासघाताच्या दरीत त्याने मला असे काही ढकलले,

खूप प्रयत्न केला तरी आयुष्य नाही सावरले...

आयुष्य नाही सावरले...

विश्वासाच्या धाग्यात मी प्रेमाची फुले गुंफली,

त्याने मात्र माझ्या भावनांचा बाजार मांडला... 

दाटला कंठ मनाला पाझर फोडून गेला, 

अनावर हुंदका मात्र मनापर्यंत ना पोहोचला...

विश्वासाची घट्ट वीण एका क्षणात उसवली, 

नात्यातील प्रेमाची ऊब त्याने कठोरपणे विझवली....

जबाबदारीच्या नावाखाली त्याने विश्वासघाताला निवडले, 

अन माझ्या बाबतच्या जबाबदारीचे हात मात्र सोयीस्करपणे 

झटकले...

क्षणभराच्या ओळखीचा हात असा काही घट्ट पकडला, 

जन्मापासूनच्या नात्याचा श्वास त्यात गुदमरला...

जीवनाच्या या बागेत प्रत्येकाचे आयुष्य बहरले, 

आपल्याच लोकांच्या घावांनी मी मात्र पुरती ढासळले... 

सरड्यापेक्षाही जलद गतीने माणसांनी रंग बदलला, 

म्हणूनच मजला दूर देशीच्या आकाशीचा चंद्र भावला...

जागत्या रात्रीची दोघांनीही पारायणे केली ,

फरक इतकाच, त्याने नवयौवनाची धुंदी अनुभवली 

तर मी विरहाची विराणी गायली...

रात्रींमध्ये दोघांच्या खूप फरक होता, 

त्याच्या सोबतीला त्याची ती 

तर माझ्या सोबतीला भयाण अंधार होता...

'आयुष्य तू' म्हणणाऱ्या त्याने आयुष्य दुसऱ्यासोबत काढले, 

जगण्याच्या या वाटेवर मला एकटे एकटे पाडले...

हात सोडूनि माझा तो निघून कायमचा गेला,

त्याच क्षणी सोबतीला एकटेपणा धावला...

विश्वासघाताने त्या मला रात्रंदिन छळले,

काय चुकले माझे याचे उत्तर आजवर न कळले... 

वर्षागणिक आयुष्य अन नाते त्यांचे बहरले, 

न केलेल्या चुकीचे उत्तर शोधण्यातच 

आयुष्य माझे सरले... 

आयुष्य सरले पण विश्वासघाताचे दुःख 

अश्वत्थामाच्या ठसठसत्या जखमेसम, 

मनी चिरंतर उरले.... मनी चिरंतर उरले....

                                        

                                                  - Rachana 


                                 

Comments

Popular posts from this blog

ग्रामीण कथाकार शंकर पाटील यांना आठवताना….