बी. जी. शिर्के लिखित 'मराठी माणूस उद्योग धंद्यात मागे का?' विषयी....

            उत्तम शेती, मध्यम व्यवसाय व कनिष्ठ नोकरी अशी आपल्या समाजात पूर्वापार चालत आलेली मानसिकता होती. पण काळानुरूप शेतीला असणारे महत्त्व कमी होत जाऊन नोकरीने ते महत्त्वाचे स्थान पटकावले. सर्वजण आर्थिक उन्नतीचे व आर्थिक स्थैर्याचे साधन म्हणून नोकरीकडे पाहू लागले. नंतर उद्योगधंदे व सर्वात कनिष्ठ शेती असा बदल झाल्याचे दिसून येते. शेती-नोकरीबाबत माणसांच्या विचारांमध्ये परिवर्तन झाले पण उद्योगधंद्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र फारसा बदलला नाही. उद्योगधंदा म्हणजे जबाबदारी व धोका अशीच मानसिकता लोकांची आजही असलेली आपणाला दिसून येते. परिणामी नोकरीला प्राधान्य देणारा समाज उद्योग-धंद्याकडे मात्र फारसा वळत नाही हे चित्र विशेषतः महाराष्ट्रात आपणाला मोठ्या प्रमाणात पहावयास मिळते. इतर राज्ये किंवा त्या राज्यांमधील  माणसे उद्योगधंद्यांमध्ये आपला जम बसवत असताना, प्रगतीची शिखरे गाठत असताना मराठी माणूस मात्र अपवाद वगळता उद्योगधंद्यांमध्ये दिसत नाही. मराठी माणसाने उद्योग धंद्यामध्ये यावे, यशस्वी व्हावे,  स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करावे यासाठी त्याने नेमके काय केले पाहिजे याचा लेखाजोखा प्रसिद्ध उद्योजक बी. जे. शिर्के यांनी 'मराठी माणूस उद्योगधंद्यात मागे का?' या आपला लेखामध्ये मांडला आहे.                       बाबूराव गोविंदराव शिर्के (ऑगस्ट १, इ.स. १९१८- ऑगस्ट १४, इ.स. २०१०) हे मराठी बांधकाम व्यावसायिक होते. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पसरणी या छोट्याशा गावात शिर्क्यांचा जन्म झाला. शिक्षणाच्या ओढीने त्यांनी कमवा व शिका हे तत्त्व आचरत शिक्षण पूर्ण केले. १९४३ मध्ये त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी मिळवली. वाई-पसरणी परिसरात व शिक्षणाची परंपरा नसणाऱ्या स्वतःच्या घराण्यात शिकून अभियंता झालेले ते पहिलेच होते. छोट्या-मोठ्या कंपन्यांत नोकरी करत उद्योगाला आवश्यक असा अनुभव त्यांनी मिळविला. सप्टेंबर ९, इ.स. १९४४ रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यांनी सुप्रीम कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी सुरू केली. त्यांना त्यांच्या उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारच्या वतीने २००३ सालचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.             बी. जी. शिर्के हे उद्योग क्षेत्रामध्ये यशस्वी उद्योजक म्हणून अतिशय नावाजलेले नाव. त्यांच्या कंपनीचा टर्नओव्हर सुमारे १२० कोटी रुपयांपर्यंतचा. घरी कसलीही शिक्षणाची परंपरा नसतानाही, उद्योग धंद्याची पार्श्वभूमी नसतानाही, आर्थिक पाठबळ नसतानाही शिर्के यांनी उद्योजक म्हणून निर्माण केलेली आपली ओळख, निर्माण केलेले आपले स्थान, केलेले समाजोपयोगी, देशोपयोगी कार्य, त्यांची ही प्रगती खचितच वाखाणण्यासारखी आहे. आत्मविश्वास, कठोर परिश्रम, कामाची शिस्त आणि एक प्रकारची सामाजिक बांधिलकी या जोरावर त्यांनी हे संपादन केले. भारतीय समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या अशा गृहनिर्माण व झोपडपट्टी निर्मूलन या अतिशय जिव्हाळ्याच्या समस्येवर शास्त्रीय असा रामबाय उपाय आत्मविश्वासाने, प्रामाणिकपणे, जिद्दीने मांडल्यामुळे मी यशस्वी ठरलो असे ते म्हणतात. 

        उद्योग व्यवसायात मराठी माणूस कुठेतरी उणा पडतो असे नेहमी म्हटले जाते. ५ व ६ फेब्रुवारी १९९४  रोजी झालेल्या तिसऱ्या जागतिक मराठी परिषदेत आपले विचार व्यक्त करताना त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे अधोरेरित केले. ते म्हणतात की आपल्या मराठी घरातील संस्कृतीमुळे, साधू संतांच्या शिकवणीमुळे मराठी माणसाचा स्वभाव हा उद्योग धंद्यासाठी थोडा प्रतिकूल बनला आहे. आपल्याला नेहमी शिकवले जाते 'ठेवीले आनंते तैसेची रहावे' किंवा 'भुकेला कोंडा व निजेला धोंडा' ही वाक्ये प्रमाण मानून आपण जगत असतो. आहे त्यात समाधान मानून राहतो. परिणामी जास्तीचे व्याप नको, आर्थिक असुरक्षितता नको, मोठे व्यवहार करायला कचरणे, मोठ्या नुकसानीला घाबरणे, इकडे जा, तिकडे जा, परदेशात जा अशा भानगडी त्याला नको वाटतात. त्यापेक्षा घरची अर्धी मीठ भाकरी त्याला बरी वाटते. लेखक म्हणतो १५०-२०० वर्षापूर्वी अशी मानसिकता ठीक होती. तेव्हा प्रगतीला वाव नव्हता. पण आता जग वेगाने बदलते आहे. आधुनिक शास्त्र-तंत्रांमध्ये विलक्षण प्रगती होत आहे. आजच्या जागतिक स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आपल्याला उद्योजकता अंगी बानवणे अपरिहार्य झाले आहे. 

      चातुर्वर्ण्य पद्धतीचा परिणामही महाराष्ट्र लोकांवर अधिक झाल्याचे लेखक नोंदवतो. परिणामी ज्या जातीत जन्मलो तीच कामे आपण करायची इतर करायची नाहीत अशी मानसिकता मराठी माणसाची आहे. मुळातच महाराष्ट्रामध्ये वैश्य वर्गीय लोक कमी होते; म्हणून तर शिवाजी महाराजांना, पेशव्यांना नवीन वसाहती वसवताना व्यापारासाठी गुजरात, मारवाडातून नगरसेवकांना पाचारण करावे लागायचे. पण आज वर्णाश्रमाची अडकाटी वेगाने नाहीशी होत आहे. परिणामी उद्योगधंदा करण्यासाठी उद्योगधंदेवाल्यांच्याच घरात जन्माला यायला पाहिजे असे काहीही नाही. उद्योजकतेचे शिक्षण देणाऱ्या, मार्केटिंग शिकवणाऱ्या अनेक शाळा-कॉलेजेस आज आपल्याला समाजामध्ये दिसून येतात. त्याचा फायदा घेऊन आजच्या तरुणाला नक्कीच यशस्वी उद्योजक होता येईल.

           मराठी तरुणांचा कल नोकरीकडे झुकलेला दिसून येतो. म्हणजे घरी चांगली जमीन असलेला मुलगादेखील शिपायाची नोकरी करतो; पण जमिनीत लक्ष घालून, आधुनिक शेतीचे ज्ञान घेऊन शेती वाढवावी, त्या पैशातून एखादा उद्योग धंदा टाकावा, त्यामध्ये प्रगती करावी असा विचार तो करत नाही. त्याची दहा ते पाच नोकरी करण्याची मानसिकता अजून गेली नाही. तो उद्योगधंदा करायला कचरतो कारण त्याला करायचा नाही. मान्य आहे महाराष्ट्राचा शेतकरी प्रगत आहे; पण लेखक म्हणतो प्रत्येक पुढच्या पिढीकडे जमीन जाताना जमिनीचे तुकडे पडतात आणि ह्या छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये प्रगत शेतकरी तरी काय करू शकणार? उलट एका भावाकडे जमीन ठेवून उरलेल्यांनी  त्याच्या साहाय्याने व्यवसाय करावेत, हळूहळू स्वतःच्या पायावर उभे राहावे; परिणामतः जमिनीचे तुकडेही पडायचे थांबतील व उद्योगधंद्यांमध्येही जम बसेल; असा उपायही लेखक सुचवतो. दुर्दैवाने आपल्याकडे शिकून नोकरीमध्ये अथवा उद्योगधंद्यामध्ये स्थिरस्थावर झालेला भाऊ देखील शेतीमधला आपला हिस्सा सोडायला तयार होत नाही. परिणामतः शेतीचे तुकडे पडतात. एकीकडे हे चित्र तर दुसरीकडे एखादा मुलगा शिकून सवरून पुढे गेला, पाठीमागच्या कुटुंबाला वर काढण्यासाठी म्हणून आर्थिक मदत करू लागला तर त्या मदतीच्या साहाय्याने आपली प्रगती करून घ्यायची तर सोडाच उलट मागे राहिलेली माणसांना त्याच्या मदतीवर अवलंबून राहायची सवय लागते. परिणामतः ते स्वतः हालचाल करून स्वतःची प्रगती करण्यासाठीचे प्रयत्न सोडून देतात. म्हणूनच लेखक म्हणतो की जमिनीचे तुकडे न पडता शेतकऱ्याच्या मुलांनी उद्योगधंदा करावा, शिक्षण घ्यावे व कष्ट करून स्वतःची प्रगती साधावी. आपल्या देशात उद्योगधंद्याला खूप वाव आहे. 

    उद्योगधंदा म्हणजे धोका या समीकरणामुळे उद्योगधंद्यांपासून चार हात लांबच राहणाऱ्या मानसिकतेला समजावताना लेखक म्हणतो उद्योग धंद्यामध्ये धोका पत्करल्याशिवाय गत्यंतर नाही. आपली महत्त्वाकांक्षा साध्य करण्याकरिता, यशस्वी उद्योजक होण्याकरिता अन्य प्रयत्नही केले पाहिजेत. उद्योगधंदा म्हणला की प्रामाणिक कष्ट आले, कठोर व अथक परिश्रम करून आवश्यक कौशल्य आत्मसात करणे आले. या गोष्टी केल्या तर यश मिळणारच. कारण म्हणतात ना, 'उद्योगाचे घरी रिद्धी-सिद्धी पाणी भरी'

          बहुतेक मराठी माणसात उद्योगास लागणाऱ्या शिस्तबद्ध मनाची, प्रवृत्तीची, संस्कृतीची उणीव जाणवते. कामासाठी योजनाबद्ध पूर्वनियोजन, त्याची योग्य अंमलबजावणी, कामाचा आढावा, हिशोबी वृत्ती यासारख्या उद्योगधंद्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी मराठी माणसांमध्ये अभावाने आढळतात. शिस्तबद्ध मन, सकाळी वेळेअगोदर कामाच्या ठिकाणी हजर असणे, संध्याकाळी काम संपल्यानंतर रोजचे हिशोब पाहणे, नफा तोटा रोजच्या रोज तपासणे हे उद्योगधंद्यात यशस्वी होण्यासाठी अत्यंत गरजेचे असते. 

         आणखी एक गोष्ट इथे बी. जे. शिर्के अधोरेखित करतात त्याची उणीव मराठी कुटुंबात अतिशय प्रकर्षाने भासते; ते म्हणजे पत्नीची/कुटुंबाची सोबत. कौटुंबिक स्वास्थ व आधार त्या गोष्टी याच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. उद्योजकाच्या पत्नीने आपल्या पतीच्या पाठीशी अतिशय ठामपणे उभे राहिले पाहिजे. घरी आल्या गेलेल्यांचे हसतमुखाने यथायोग्य स्वागत केले पाहिजे. कामधंद्याच्या निमित्ताने पतीला बाहेर बराच वेळ द्यावा लागत असेल तर ते समजून घेतले पाहिजे. आपल्या पतीला अतिशय खंबीरपणे साथ आणि सोबत दिली पाहिजे. एकंदरीत उद्योगधंद्याला पोषक नसलेली आपल्या घरातील संस्कृती बदलणे, उद्योजकाच्या पत्नीने समजूतदारपणा दाखवणे गरजेचे आहे.

         उद्योगधंदेवाले म्हणजे लबाड अशी एक समजूत लोकांच्या मनात ठाण मांडून बसली आहे. ती काही अंशी खरी असली तरी इथून पुढे फार काळ उद्योगधंद्यामध्ये ही लबाडी चालणार नाही असे लेखक म्हणतो. आज स्पर्धेच्या युगात मालाच्या दर्जाला अत्यंत महत्त्व आले आहे; त्यामुळे जो सचोटीने काम करेल, उत्कृष्ट प्रतीचा माल निर्माण करेल, कमीत कमी किमतीत ठरल्या वेळेमध्ये मालाचा पुरवठा करेल तोच उद्योगधंद्यामध्ये टिकून राहील. गिर्‍हाईकांना फसवून लबाडीने व्यापार करण्याचे दिवस आता गेले. मालाचा दर्जा, विक्रेत्याचा नम्रपणा, उत्तम व दर्जेदार सेवा, ग्राहकांचा विश्वास, पैशाचे चोख व्यवहार या कौशल्यावर उद्योजक बाजारात व बँकेत पत मिळवू शकतो. त्यामुळे व्यापार उदीम हे लबाडीचे क्षेत्र असे म्हणून मराठी तरुणाने याकडे पाठ फिरवणे चुकीचे आहे. 

        काही काही समाजात, जातीत लोकं एकमेकांना उद्योग व्यवसायात मदत करतात. परिणामी तो समाज, जात उद्योग व्यवसाय प्रचंड प्रगती करताना दिसून येतात. लेखक म्हणतात मराठी समाजाने हा गुण आता पर्यंत आत्मसात केला नाही तो आत्मसात करण्याची गरज आहे. एकमेकांचा दुस्वास न करता एकमेकांना मदत केली पाहिजे. एखाद्याला मदत नाही करता आली तरी किमान वर जाणारे पाय तरी ओढू नये. असे केले तर मराठी समाजाचीही प्रगती होईल व आपल्या मराठी माणसात उद्योजक नक्कीच निर्माण होतील. 

        उद्योगधंद्यात सर्वात पुढारलेले राज्य असणाऱ्या महाराष्ट्रात मराठी माणूस मात्र उद्योगधंद्यात फार कमी आहे. ही वस्तुस्थिती खरी असली तरी चित्र अत्यंत निराशजनक आहे असे म्हणता येणार नाही. हळूहळू मराठी माणसाचा स्वभाव बदलतो आहे. तो उद्योगधंद्याकडे वळतो आहे. सहकारी साखर कारखान्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मोठीच क्रांती घडवून आणली. ग्रामीण मराठी माणसात उद्योजकतेचे बी पेरले. हळूहळू शेतकरी माणसे उद्योगात उतरू लागली आहेत. तरुण मुले छोटे-मोठे उद्योग-व्यवसाय सुरू करू लागले आहेत. जागतिकीकरणाच्या व खाजगीकरणाच्या धोरणांना ही बाब अतिशय पोषक आहे. त्यामुळे भविष्यकाळात मराठी माणूस या उद्योग-व्यवसायात नक्कीच पुढे येईल अशा आशावाद लेखकाला वाटतो.

           लेखक म्हणतो की महाराष्ट्र हा डोंगर, नद्या, नाले, दगड-धोंड्यांचा प्रदेश असल्यामुळे येथे मुळातच शेती कमी आहे. त्यामुळे जोडधंदा किंवा उद्योगात शिरल्याशिवाय महाराष्ट्रातील तरुणांना पर्याय नाही. विशेषत: सुशिक्षित मध्यमवर्गीय तरुण अजूनही नोकरीच्या मागे लागतो आहे. ती वृत्ती कुठेतरी बदलली पाहिजे. खाजगीकरणामुळे सरकारी नोकऱ्या अगोदरच कमी झालेल्या आहेत. खाजगी कंपन्यांमध्ये प्रचंड काम करावे लागते. कष्टाशिवाय, परिश्रमाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे उद्योगधंद्यांकडे मुलांनी वळावे. शिकलेल्या मुलांना आता भांडवलाचाही जास्त प्रश्न पडत नाही कारण प्रशिक्षितांना बँका भांडवल पुरवतात. साधने उपलब्ध आहेत. त्यामुळे मराठी माणसाने थोडीशी जोखीम पत्करून, हिम्मत ठेवून प्रामाणिकपणे कष्ट करण्याची वृत्ती ठेवून, येणाऱ्या प्रसंगाला तोंड देण्याचे धैर्य आत्मसात करून, स्त्रियांनी पुरुषांना प्रोत्साहन व पाठिंबा देऊन महाराष्ट्राचा उद्योग-व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये कायापालट करण्याची गरज आहे. 

                एकूणच  एकमेकांमधले हेवेदावे, भांडण-तंटा, पाय ओढणे ही खेकड्यासारखी वृत्ती पूर्णपणे सोडून देऊन शिस्त, अपार असे प्रामाणिक कष्ट, सर्वोत्तम दर्जाचा माल, मालाचा वेळेवर पुरवठा, नंतरची दर्जेदार सेवा, योग्य किंमत, ग्राहकांचे समाधान या बळावर मराठी माणूस नक्कीच यशस्वी व सर्वोत्तम उद्योजक होईल असा आशावाद बी. जी. शिर्के व्यक्त करतात.

                                          रचना माने, कोल्हापूर 




            

Comments

Popular posts from this blog

ग्रामीण कथाकार शंकर पाटील यांना आठवताना….