झुक झुक झुक झुक आगीनगाडी, धुरांच्या रेघा हवेत काढी, पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊ या .... हे गाणे ऐकताच आपल्याला आठवते ते आपले रम्य बालपण. आणि मामाच्या गावी घालवलेला सुट्टीचा तो रम्य काळ. आपला तो लहानपणीचा काळ आणि मामाच्या गावी घालवलेल्या आपण त्या सुट्ट्या, त्या गोड आठवणी. या साऱ्या आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय आठवणी म्हणजे आपल्या आयुष्यातील अनमोल ठेवाच असतो. त्या आठवणी, ती माणसं, तिथला निसर्ग, खाणं-पिणं, खेळ, मौजमस्ती, गप्पा-गोष्टी, रूढी, परंपरा, या साऱ्यातून कळत-नकळत झालेले संस्कार, मिळालेले ज्ञान या सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येक माणूस हरवून जातो. सलीम मुल्ला यांनी सुद्धा 'चांदणटिकल्या' या ललितगद्याच्या माध्यमातून आपल्या बालपणीच्या रम्य आठवणींना येथे उजाळा दिला आहे. लेखक सलीम सरदार मुल्ला (तळंदगे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) हे एक बालसाहित्यकार आहेत. वन विभागात कार्यरत असणाऱ्या सलीम यांनी न...