मराठी राजकीय नाटक व गो. पु. देशपांडे

        मराठी माणूस आणि नाटक यांचे अतूट असे नाते आहे. मराठी रंगभूमीला लोकमताचा उदार आश्रय अखंडपणे लाभला. रंगभूमीनेही मराठी माणसाला भरभरून दिले. मागे वळून या नाटकाच्या प्रारंभाकडे पाहिले की लक्षात येते की १८४३ मध्ये विष्णूदास भावे यांनी 'सीता स्वयंवर' हे पहिले मराठी नाटक लिहून सादर केले. त्यापूर्वी नाटक नव्हते असे नाही. पण १८४३ पूर्वीच्या नाटकांना लिखित संहिता नव्हती. त्यामुळे मराठी नाट्यवाङमयाचा प्रारंभ १८४३ मानला जातो. या सुरूवातीच्या कालखंडातील नाटके प्रामुख्याने पौराणिक व ऐतिहासिक घटनांवर आधारित होती. नाटकाचे स्वरूप रांगडे, ओबडधोबड होते. या कालखंडातील नाट्य वाड्मयाचा एक विशेष येथे आवर्जून नोंदवावासा वाटतो तो म्हणजे संस्कृत नाटकाच्या भाषांतराने प्रारंभ झालेल्या मराठी नाट्य वाङमयात आरंभपासूनच ऐतिहासिक, कल्पनारम्य, सामाजिक, राजकीय अशा निरनिराळ्या प्रवृत्तींचा उदय झाला. अशा रीतीने १८६० ते १८८० या काळात नाट्य वाङमयातील भिन्न भिन्न प्रवत्तींना सुरूवात झाली होती.

       यानंतरच्या कालखंडात म्हणजे १८८० ते १६२० या कालखंडात मराठी रंगभूमीची कल्पनातीत भरभराट झाली. मराठी रंगभूमीला वैभवाचे दिवस प्राप्त झाले. आण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, राम गणेश गडकरी, वासुदेवशास्त्री खरे, टिपणीस या प्रतिभावान लेखकांनी मराठी नाट्यसृष्टीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. परिणामी १८८५ ते १९२० हा कालखंड मराठी रंगभूमीचा वैभवाचा कालखंड म्हणून ओळखला जाऊ लागला. या काळातील नाटकाचा संगीत हा अविभाज्य भाग होता. संगीत नाटके लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होती. १९२० पर्यंत हे वैभव टिकून होते. आण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल यांनी संगीताचा योग्य वापर केला. पण नंतरच्या नाटककारांनी मात्र संगीताला फाजिल महत्त्व दिले. १९२० ते १९५० या कालखंडात नाट्यसृष्टीत पुष्कळ स्थित्यंतरे झाली. १९२० पर्यंत वैभवाच्या शिखरावर विराजमान असणाऱ्या नाटकाला, त्याच्या वैभवाला उतरती कळा लागली. नाट्यलेखन आणि नेपथ्यरचना यात बदल करूनही नाटकाला लागलेली ओहोटी थोपवून धरता आली नाही. चित्रपटाच्या उदयानंतर तर मराठी रंगभूमी नेस्तनाबूत होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. रंगभूमीच्या या पडत्या काळातही नाटकाला उर्जितावस्था प्राप्त करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न काही नाटककारांनी केला. त्यात प्रामुख्याने मामा वरेरकर, मा. ना. जोशी, बेडेकर, प्र. के. अत्रे, मो. ग. रांगणेकर, वि. वा. शिरवाडकर, नाना जोग यांचा उल्लेख करता येईल. याच काळात मराठी नाटकांनी आपली विषयसीमा आणखी विस्तारली. तंत्रामध्ये महत्त्वपूर्ण बदल केले. सामाजिक नाटकाबरोबरच राजकीय, अनुवादीत नाटकाचा प्रवाह, इब्सेन नाट्यतंत्राचा वापर, एकांकीकेचा उदय, नाट्यछटांची लोकप्रियता असे अनेक बदल मराठी नाट्यसृष्टीत झाले. विविध नवे प्रवाह अस्तित्वात आले.

      मराठी नाट्यसृष्टीतील विविध प्रवाहपैकी एक प्रवाह म्हणजे 'राजकीय नाटक'. मराठी नाटकाच्या इतिहासात सुरुवातीपासून ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक, कौटुंबिक नाटकाच्या तुलनेते राजकीय नाटकाचा प्रवाह काहीसा क्षीण स्वरूपाचा राहीला. तुलनेने कमी प्रमाणात राजकीय नाटके लिहिली गेली. राजकीय नाटक महटले की राजकीय अनुभवांची स्वायत्तता आलीच. राजकीय अनुभवांच्या स्वायत्ततेला अनन्यसाधारण महत्त्व असते. इतर नाटकांप्रमाणेच राजकीय नाटकामध्येही मानवी ताणतणाव, संघर्ष असतात. असे असले तरी राजकीय नाटक स्वतःचा विशिष्ट असा विषयपरिघ आखून होते. अशाप्रकारच्या नाटकांमधील मूल्ये शाश्वत असतात.

राजकीय नाटककार -

      सुरुवातीच्या कालखंडापासून राजकीय नाटक अस्तित्वात असल्याचे दिसून येते. बंगाल्यातील निळीच्या मळ्यांवरील मजुरांच्या दारून स्थितीचे चित्र वठविणारे 'नीलदर्पण' हे नाटक भाषांतरीत असले तरी अर्धवट राजकीय प्रश्नावरील नाटक म्हणून त्याचा उल्लेख जरूरीचा ठरतो.

नारायण बापूजी कानिटकर-

१८८० ते १६१७ या कालखंडातील एक महत्त्वाचे नाटककार म्हणजे नारायण बापूजी कानिटकर. उसळत्या भावना, तडफेची भाषा, अतिरेकी वर्णने, प्रतिपक्षावर सडकून प्रहार करणे यासारखी नाट्य वैशिष्ट्ये असणाऱ्या चौफेर दृष्टीच्या कानिटकरांनी 'तरूणीशिक्षण नाटीका' (१८८६) 'संमती वयाचे नाटक' (१८६२) यासारख्या सामाजिक प्रश्नांना अधोरेखित करणाऱ्या नाटकांप्रमाणेच राजकीय बाबीवरतीही नाट्यलेखन केले. बडोद्याचे मल्हारराव महाजन यांच्यावर जो सुप्रसिध्द विषप्रयोगाचा खटला झाला त्यावर त्यांनी नाटक लिहिले. न्यायविजय १८८८ च्या सुमारास गाजलेल्या कॉफर्ड प्रकरणावर नारायण कानिटकरांनी 'न्वायविजय' हे नाटक लिहिले. या नाटकातून त्यांचे देशप्रेम, न्यायप्रेम व देशभक्तीविषयक उदात्त विचार व्यक्त झाले आहेत. कलादृष्ट्याही हे नाटक उत्कृष्ट वठले आहे.

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर-

खाडिलकरासारख्या ध्येयवादी नाटककाराने राजकीय, सामाजिक, वैयक्तीक ध्येयांची उदात्त चित्रे आपध्या नाटकांतून रंगविली. नाट्य तंत्रावर असामान्य प्रभुत्व असणाऱ्या खाडिलकरांच्या नाटकाचा कलापूर्ण, तंत्रशुध्द, बांधेसूद, ठशीव, रेखीव रचना हा फार मोठा विशेष होता. खाडिलकरांची ऐतिहासिक, पौराणिक नाटके केवळ ऐतिहासिक, पौराणिक न ठरता त्यातून तत्कालिन राजकीय व सामाजिक परिस्थितीवर सुंदर भाष्य केलेले असे.

वि. वा. भोळे - 

भोळे यांनी प्रजेचा संतोष हाच राजाच्या सिंहासनाचा पाया या सिध्दांताची मांडणी 'अरुणोदय' या नाटकाद्वारे केली. 

      १९२० नंतरच्या कालखंडातील नाटकात आशयाच्या दृष्टीने विविधता होती. या कालखंडाचा उल्लेख प्रामुख्याने सामाजिक नाटकाचा कालखंड म्हणून केला असला तरी राजकीय प्रश्न या कालखंडात नाटकातून हाताळले गेले. १९२० नंतर गांधीयुगाचा प्रारंभ झाला. गांधीच्या विचारसरणीने सारा देश भारावून गेला. अनेक राजकीय, आर्थिक प्रश्नांची चर्चा सर्वत्र होऊ लागली. त्याचा परिणाम नाट्यसृष्टीवरही होणे स्वाभाविक होते. १९२० ते १९५० च्या कालखंडातील नाट्यसृष्टीवर या राजकीय समस्यांचाही परिणाम झाला. परिणामतः तत्कालिन नाटकात राजकीय समस्यांचे प्रतिबिंब उमटल्याचे ठळकपणे जाणवते. ब्रिटिशांचे वर्चस्व, राजकीय गुलामगिरी, ब्रिटिशांकडून होणारे भारताचे आर्थिक शोषण, हिंदू मुस्लिमांचे झगडे, तत्कालिन राजकीय घटना, अस्पृशांची समस्या, सावकारी पाश, शेतकऱ्यांची दैन्यावस्था इ. अनेक समस्या नाट्यविषय बनल्या.

मामा वरेरकर -

सामाजिक नाटककार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरेरकरांनी हुंड्याचा प्रश्न, प्रौढ कुमारिकेच्या विवाहाचा प्रश्न, गृहस्थाश्रम, पाप-पुण्याच्या कल्पना, समाजातील खालावलेली नीतिमत्ता यासारख्या सामाजिक विषयांवर बहुतांशी नाटके लिहिली असली तरी काही राजकीय नाटकेही लिहिली आहेत. वरेरकरांची 'सत्तेचा गुलाम', 'सिंगापूरातून', 'तुरूंगाच्या दारात', 'कोरडी करामत', अपूर्व बंगाल', 'करग्रहण' ही नाटके राजकीय प्रश्नांची चर्चा करणारी नाटके ठरली.

         'सिंगापूरातून' (१९४४) - दुसरे महायुध्द सुरू झाल्यानंतर पूर्वेकडून जपानचे आक्रमण होईल अशी भयसूचक चिन्हे दिसू लागताच, तशी परिस्थिती निर्माण होताच सिंगापूरातील भारतीयांनी हे आक्रमण थोपवण्यासाठी केलेल्या आत्मबलिदानाचे चित्रण 'सिंगापूरातून' या नाटकातून वरेरकरांनी केले.

       'द्वारकेचा राजा' १९५२ साली लिहिलेल्या या नाटकात वरेरकरांनी आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या राजकीय विषयासाठी एका पौराणिक कथेचा रूपकात्मक वापर केला आहे. कृष्ण व जरासंध यांच्यातील लढाचा यात वापर केला आहे. कृष्णाचा पराभव करण्यासाठी जरासंध परकीयांची म्हणजे बर्बर देशाच्या कालयवनाची मदत घेतो. पण मदत घेऊनही शेवटी पराभूत होतो. या नाटकाच्या माध्यमातून भारताने परकीय मदतीचा स्वीकार करावा की न करावा यावर सुंदर व परिणामकारक भाष्य केले आहे. तसेच ज्याला लोकशिक्षणाचे कार्य करावयाचे आहे त्याने अधिकारपदाचा मोह धरू नये हा विचारही कृष्णाच्या माध्यमातून मांडला आहे.

प्र. के. अत्रे -

प्र. के. अत्रे हे या कालखंडातील एक अत्यंत महत्त्वाचे नाटककार. अत्रेंचा उदय झाला नसता तर बोलपटाच्या झंझावती आक्रमणाने भांबावलेली नाट्यसृष्टी पूर्णपणे रसातळाला गेली असती. मराठी रंगभूमीकडे पूर्णपणे पाठ फिरवून बोलपटाच्या आहारी गेलेल्या प्रेक्षकांना पुन्हा रंगभूमीकडे वळविण्याचे महत्त्वाचे कार्य अत्रेंनी केले. 'साष्टांग नमस्कार' (१९३३) या नाटकाद्वारे नाट्य लेखनास प्रारंभ केलेल्या अत्रेंनी पुढे 'भ्रमाचा भोपळा' (१९३५), 'लग्नाची बेडी' (१८३६), 'वंदे मातरम (१६३६), 'पराचा कावळा' (१९३८), 'पाणीग्रहण' (१६४५), 'कवडीचुंबक' (१६५१), 'मी मंत्री झालो', 'तो मी नव्हेच', 'मी उभा आहे', 'घराबाहेर, 'उद्याचा संसार', 'जग काय म्हणेल' अशी एकापेक्षा एक सरस अशी विनोदी त्याचप्रमाणे समस्या प्रधान गंभीर नाटके लिहिली. बहुरंगी व्यक्तिमत्त्वाच्या अत्रेंनी नाटकाच्या माध्यमातून प्रचलित राजकारणावर प्रहार केला आहे.  अत्रेंची 'वंदेमातरम', 'मी उभा आहे' ही राजकीय प्रश्नांवर आधारलेली विनोदी नाटके खूपच लोकप्रिय ठरली. 'वंदेमातरम' हे नाटक १९३७ मधील मुंबई प्रांताच्या राजकीय घडामोडींवर आधारित आहे. 'मी उभा आहे' या नाटकाचे लेखन स्वातंत्र्योत्तर काळातील निवडणूकांची पार्श्वभूमीवर झाले आहे. सत्तेच्या प्रांगणात माणसे कशी उन्मत्त होतात याचे प्रत्त्ययकारी चित्रण 'मी मंत्री झालो' या नाटकात केले आहे.

     पुढे १९५० ते १९६० या कालखंडात पु. ल. देशपांडे, बाळ कोल्हटकर, वि. वा. शिरवाडकर, व. ना. नवरे, मधुकर तोरडमल, विजय तेंडूलकर, श्री. ना. पेंडसे, जयवंत दळवी, वसंत कानेटकर, रत्नाकर मतकरी, रणजित देसाई, वसंत सबनिस, मधुसुदन कालेलकर, विद्याधर गोखले, अनिल बर्वे, विद्याधर पुंडलिक, सुरेश खरे, पुरूषोत्तम दारव्हेकर यासारख्या नाटककारांनी आपल्या नाट्यप्रतिभेने नाटकाच्या वैभवात भरच टाकली मराठी रंगभूमीला मोठे करण्यात, नाट्यतंत्रात विविधता आणण्यामध्ये कमी-अधिक प्रमाणात या सर्वांचे योगदान होते. काळानुरूप नाट्यतंत्र, नेपथ्य यात बदल झाले. अनेक विषय हाताळले गेले

वसंत कानेटकर -

वसंत कानेटकर हे एक अत्यंत यशस्वी नाटककार 'वेड्याचे घर उन्हात', 'देवाचे मनोराज्य', 'प्रेमा तुला रंग कसा?', 'रायगडला जेव्हा जाग येते', 'दोन ध्रुवावर दोघे आपण', 'मत्सगंधा', 'मोहिनी', 'अश्रुंची झाली फुले', 'लेकुरे उदंड झाली', 'इथे ओशाळला मृत्यू', 'तुझा तू वाढवी राजा', 'घरात फुलला पारिजात', 'मला काही सांगायचय', 'हिमालयाची सावली', 'मीरा मधुरा', 'माणसाला डंख मातीचा' अशी अनेक यशस्वी नाटके त्यांनी मराठी रंगभूमीला दिली. त्यांनी प्रचलित पुढाऱ्यांची खिल्ली उडवण्याच्या हेतूने 'सूर्याची पिल्ले' हे नाटक लिहिले.

           वि. वा. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, जयवंत दळवी, श्रीनिवास जोशी आदी नाटककारांनी राजकीय पार्श्वभूमी असलेली राजकीय नाटके लिहिली. तर विजय तेंडूलकर, गो. पु. देशपांडे, सतीश आळेकर, दत्ता भगत, शफाअत खान आदी नाटककारांनी गंभीर प्रवृत्तीची, प्रेक्षकानुनयास बळी न पटणारी राजकीय नाटके लिहिली. पण या नाटककारांच्या निवडक राजकीय नाटकांचा अपवाद वगळता राजकीय नाटकांची परंपरा मराठी नाट्यवाङमयात दाखवता येत नाही. पण या सर्व पार्श्वभूमीवर सातत्याने राजकीय नाट्यानुभवांची मांडणी आपल्या नाटकांद्वारे करणारे नाटककार म्हणून गो. पु. देशपांडे यांचा उल्लेख करावा लागतो.

राजकीय नाटककार गो. पु. देशपांडे -

मराठी रंगभूमीवर प्रायोगिक धारा ठसठशीतपणे दिसू लागल्यावर विजय तेंडूलकर यांच्यानंतरची नाटककारांची जी पिढी उदयास आली त्यातील सतीश आळेकर, महेश एलकुंचवार आणि गो. पु. देशपांडे हे महत्त्वाचे नाटककार. रंगभूमीवर नवे प्रायोग करणारे ज्येष्ठ नाटककार, समीक्षक, विचारवंत गो. पु. देशपांडे यांचा जन्म २ आगस्ट १९३८ रोजी नाशिक येथे झाला. कविता हा गो. पुं. च्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग. मात्र त्यांनी या वाङमयप्रकारात विपुल लेखन केले नाही. त्यांचा 'इत्यादी इत्यादी' हा एकमेव पण लक्षणीय कवितासंग्रह. गो. पु. नी वैचारिक लेखनही विपुल प्रमाणात केले. 'इपीडब्लू' या नियतकालिकातून त्यांनी राजकीय व आर्थिक मीमांसा केली. रहिमतपूरकरांची निबंधमाला या मालेत 'नाटकी निबंध' व 'चर्चक निबंध' या त्यांनी लिहिलेल्या दोन पुस्तकांमुळे मराठी वाङमयात जवळपास मृतपाय झालेल्या निबंध या वाङमय प्रकाराला नव्याने चालना मिळाली. राजकीय विषयांवर इंग्रजीतून विविध नियतकालिकांत त्यांनी विपुल लेखन केले. पण त्यांची मुख्य ओळख आहे ती नाटककार व विशेषतः राजकीय नाटककार म्हणून.

       गो. पु. नी 'उध्वस्थ धर्मशाळा' (१९७४), 'चाणक्य विष्णुगुप्त, 'एक वाजून गेला आहे', 'अंधारयात्रा', 'अस्सा नवरा सुरेख बाई', 'अखेरचा रस्ता', 'शेवटचा दिस', 'मामकः पाडवाश्चैव', 'सत्यशोधक' (१९६४) अशी नाटके लिहिली. गो. पु. चे वेगळेपण असे की मराठी नाट्यवाङमयात राजकीय वैचारिक नाटकांची उणीव भासत असताना त्यांनी संपूर्णपणे राजकीय वैचारिक नाटकेच सातत्याने लिहिली. आणि एक स्वतंत्र वाट मराठी रंगभूमीवर निर्माण केली. गो. पु. ज्येष्ठ नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचे नातू. त्यांच्याच राजकीय नाटकांचा वारसा गो. पु. नी अभिनव पध्दतीने पुढे नेला.

     गो. पु. देशपांडे या नाटककाराने ५० वर्षांपूर्वी आपल्या 'उध्वस्थ पर्मशाळा' या नाटकाद्वारे मराठी नाट्य प्रवाहाला एक वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न केला. १९७४ मध्ये प्रसिध्द झालेल्या या नाटकाने भारतीय रंगभूमीला राजकीय नाटकांचे नवे दालन उघडून दिले. या पहिल्या राजकीय आशयाच्या नाटकाचे प्रयोग डॉ. श्रीराम लागू यांनी आपल्या 'रूपवेध' या संस्थेद्वारा प्रायोगिक रंगभूमीवर केले आणि गो. पुं. कडे सर्वांचे लक्ष वेधले. त्यातील राजकीय व सामाजिक आशयामुळे हे नाटक गाजले. या नाटकातील अनुभव व नाट्याचे सादरीकरण उल्लेखनीय आहे. एका प्राध्यापकाच्या विभागीय चौकशीच्या स्वरूपात समोर येणारे हे नाटक, विशिष्ट निष्ठा स्वीकारणाऱ्या माणसाचा खाजगी आणि कार्यव्याप्त आयुष्यातही विविध स्तरांवरील संघर्ष, प्रश्न विचारणाऱ्या माणसाचे कुटुंबापासून अलग होणे, पूर्णपणे एकाकी पडणे हे सारे चौकशी व आठवणी यातून सादर झाले आहे.

       दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्राध्यापक असणाऱ्या, डाव्या विचारसरणीच्या आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक असणाऱ्या गो. पु. नी विचारप्रधान नाटके लिहिताना सतत आपल्या राजकीय धारणा व विचारसरणी यांची चिकित्सा केली. याची साक्ष त्यांच्या 'अंधारयात्रा', 'रस्ते', 'चाणक्य विष्णुगुप्त', 'शेवटचा दिस' या नाटकातून मिळते. मार्क्सवादी जीवनदृष्टी असणारी पात्रे, त्याविरूध्द विचारप्रणाली असणारी इतर पात्रे, राजकीय वातावरण, त्यांच्यातील संघर्ष गो. पु. च्या नाटकात पहावयास मिळतो. या नाटकाद्वारे त्यांनी भारतीय रंगभूमीवर स्वतःची वेगळी ओळख प्रस्थापित केली. गो. पु. च्या लिखाणात भारतीय परंपरेतील अनेकानेक घटकांचा उल्लेख सहजगत्या येतो. त्यांच्या नाटकातील संवादभाषा अभिजात वळणाची व रचना पारंपरिक असल्याचे दिसून येते. असे असले तरी विचारांच्या नाविन्यामुळे त्यांचे वेगळेपण उठून दिसते.

     गो. पु. नी १९९४ साली लिहिलेले 'सत्यशोधक' हे म. फुलेंच्या जीवनावरील एकमेव नाटक. या नाटकाचे लेखन त्यांनी सत्यशोधक जलशांच्या शैलीने केले आहे. इतिहास व परंपरा यांचा आधुनिक काळाच्या संदर्भात अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केलेले हे नाटक गो. पु. व्या कारकीर्दीतील वेगळं नाटक आहे.

        मराठी रंगभूमीची मूळ खंत वैचारिक नाटक नाही अशी असताना गो. पु. नी राजकीय वैचारिक नाट्यलेखन सातत्याने केले. गो. पु. डाव्या विचारसरणीचे असल्याने त्यांच्या लेखनात ही विचारसरणी प्रभुत्व गाजवताना दिसते. गो. पु. ची नाटके काहीशी चर्चात्मक वाटतात. नाटकाद्वारे राजकीय विचारांची, राजकीय जाणिवांची मांडणी अत्यंत गंभीरपणे केल्याने कदाचित त्यांची नाटके चर्चात्मक वाटत असतील. चर्चात्मकतेबरोबरच वैचारिकता हे ही त्यांच्या नाटकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. एकप्रकारे विचारनाट्य, चर्चानाट्याची सुरुवातच गो. पु. नी केली. मनोरंजनाच्या हेतूने नाट्यनिर्मिती न करता वाचकांच्या, प्रेक्षकांच्या अभिरूचीला वळण लावण्यासाठी त्यांनी नाट्यनिर्मिती केली. 'अंधारयात्रा', 'विष्णुगुप्त चाणक्य' यासारख्या नाटकांद्वारे आजच्या भारतीय समाजकारणाचा, समाज व्यवस्थेचा विचार गो. पु. नी शेकडो वर्षापूर्वीच्या भारतीय समाजकारण आणि राजकारणाच्या संदर्भातून केला. नवीन प्रश्न उभे केले. ते उभे करताना राजकारणाचा इतिहास त सांगता त्यावर भाष्य केले. नाटकाद्वारे आपली विचारसरणी पात्रांच्या तोंडून व्यक्त करणे, नाटक या माध्यमाचा काहीसा बांधिलकी म्हणून विचार केल्याने त्यांचे लिखाण प्रायोगिक मर्यादेत अडकून पडल्यासारखे वाटणे यासारख्या काही त्रुटी त्यांच्या नाटकात जाणवत असल्या तरी तंत्रावर हुकुमत असणाऱ्या गो. पु. वे स्वतंत्र निर्मिती करणारे नाटककार, राजकीय नाटककार म्हणून मराठी नाट्यसृष्टीत एक वैशिष्ट्यपूर्ण व महत्त्वपूर्ण स्थान आहे.


संदर्भग्रंथ -

१. प्रदक्षिणा, खंड पहिला, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे, पाचवी आवृत्ती १९७२

२. प्रदक्षिणा, खंड दुसरा, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे, प्रथम आवृत्ती १६६१

              

                                               - रचना माने, कोल्हापूर






Comments

Popular posts from this blog

ग्रामीण कथाकार शंकर पाटील यांना आठवताना….