ग्रामीण कथाकार शंकर पाटील यांना आठवताना….
सुप्रसिद्ध मराठी कथाकार शंकर पाटील यांची आज जन्म शताब्दी. आजपासून बरोब्बर शंभर वर्षांपूर्वी म्हणजेच ८ ऑगस्ट १९२६ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथे शंकर पाटील यांचा जन्म झाला.
यांचे शिक्षण तारदाळ, गडहिंग्लज व कोल्हापूर या गावी झाले. बी.ए.बी.टी पर्यत शिक्षण घेतल्यानंतर ते रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून रुजू झाले. रयत शिक्षण संस्थेच्या शाळांतून अध्यापन करत असतानाच १९५७ मध्ये त्यांची आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर नियुक्ती झाली. ८ वी ते १० वी ह्या इयत्तांसाठी त्यांनी ग. वि. अकोलकर आणि ग. प्र. प्रधान यांच्या सहकार्याने ‘साहित्य सरिता' या वाचनमालेचे संपादन केले. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळात मराठी भाषा विषयासाठी विशेष अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. मराठी आणि अन्य सहा भाषांतील पाठयपुस्तकांसाठी विद्यासचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. १९५९ मध्ये एशिया फाउंडेशनची शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ग्रामजीवनाचा अभ्यास केला. ग्रामजीवनाचा तो अनुभव त्यांनी १९६४ मध्ये ‘टारफुला’ या कादंबरीद्वारे शब्दबद्ध केला. त्यांच्या कथालेखनाला बहर आला तो १९६० ते १९६८ या काळात.
छोट्या खेड्यात जन्मल्या व वाढल्यामुळे तिथल्या मातीशी नाळ जोडलेल्या शंकर पाटील यांच्या लेखनात स्वाभाविकपणे ग्रामीण रितीरिवाज, श्रद्धा-अंधश्रद्धा, जत्रा-यात्रा-खेत्रा, रूढी, परंपरा, ग्रामीण मानसिकता याच्यासोबतच शेती, माती, नाती, गुरं-ढोरं, शिवारं, निसर्ग, नद्या, नाले, ओढे, विहिरी असा गावगाड्यातील हा सगळा गोतावळा केंद्रस्थानी राहिला. परिणामी अस्सल ग्रामजीवनाचे दर्शन हा त्यांच्या साहित्य लेखनाचा कायमच मुख्य गाभा राहिला. ग्रामीण जीवन, ग्राम मानस, त्यांचा भोळेपणा, इरसालपणा, बेरकीपणा, तेथील माणुसकी, ग्रामीण भागातील संपन्नता, गावगाड्यातील राजकारण, निसर्ग या साऱ्याचे अगदी यथार्थ, वास्तववादी व प्रत्ययकारी दर्शन शंकर पाटील यांनी आपल्या साहित्यातून घडवले. 'वळीव' हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९५८ मध्ये प्रसिद्ध झाला. नंतर भेटीगाठी (१९६०), आभाळ (१९६१), धिंड (१९६२), ऊन (१९६३) , वावरी शेंग (१९६३), खुळ्याची चावडी (१९६४), पाहुणी (१९६७), फक्कड गोष्टी (१९७३), खेळखंडोबा (१९७४), ताजमहालमध्ये सरपंच (१९७७), बंधारा यासारखे अस्सल ग्रामीण बाज असेलेले एकापेक्षा एक कथासंग्रह प्रसिद्ध झाले. वळीव ते ऊनपर्यंतच्या त्यांच्या प्रत्येक कथासंग्रहाने त्या वर्षातील उत्तम कथासंग्रह म्हणून महाराष्ट्र राज्याच्या पारितोषिकावर स्वतःचे नाव कोरले. निवडक शंकर पाटील (१९६६) हा त्यांच्या प्रातिनिधिक कथांचा संग्रह. त्यांच्या कथांचे भारतीय पाश्चात्त्य भाषांत अनुवादही झाले. गल्ली ते दिल्ली, कथा अकलेच्या कांद्याची, लवंगी मिरची कोल्हापूरची इ. त्यांची वगनाट्ये लोकप्रिय ठरली. वावटळ ही पटकथा लिहून त्यांनी चित्रपटक्षेत्रात पाऊल ठेवले. युगे युगे मी वाट पाहिली, गणगौळण, भोळीभाबडी, चोरीचा मामला इ. चित्रपटांच्या उकृष्ट पटकथा-संवादलेखनाबद्दल त्यांना शासकीय पुरस्कार लाभले. याशिवाय पिंजरा, केला इशारा जाता जाता, एक गाव बारा भानगडी, डोंगरची मैना, छंद प्रीतीचा, भोळीभाबडी, पाहुणी, लक्ष्मी अशा गाजलेल्या मराठी चित्रपटांसाठी पाटील यांनी पटकथा व संवादलेखन केले आहे. १८ कथासंग्रह, २ कादंबऱ्या, ४ वगनाट्ये, एक ललितसंग्रह आणि पन्नासएक चित्रपटकथा, पटकथा, संवाद यांचे लेखन करून या सरस्वती पुत्राने मराठी साहित्याला, मराठी चित्रपटाला पर्यायाने मराठी मनाला समृद्ध, संपन्न केले.
ग्रामीण समाजाचे हुबेहुब चित्रण अतिशय प्रत्यकारीपणे आणि काहीशा विनोदी ढंगाने करण्यात शंकर पाटील यांचा हातखंडा होता. त्यांच्या लेखनात कसदारपणा होता. ग्रामीण जीवनाचा आणि तेथील माणसांचा आणि त्यांच्या मानसिकतेचा विविधांगी असा अचूक वेध घेण्याची क्षमता त्यांच्या लेखणीत होती. अवतीभोवतीचा निसर्ग ते आपल्या लेखनात अतिशय प्रत्ययकारीरित्या उतरवतात. वाचकाला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखनशैलीमध्ये होते.
व्यक्तिमनाचा अगदी पदर न् पदर अलगदपणे उलगडून दाखवण्याची विलक्षण हातोटी त्यांच्या कथांमधून आपणाला जाणवते. त्यांची भाषा ही त्या कथांतून व्यक्त होणाऱ्या अनुभवांची भाषा आहे. कोल्हापूर कागल निपाणी या प्रदेशाच्या पार्श्वभूमी वरती आकारास आलेल्या त्यांच्या कथेत या परिसरातील बोलीभाषा आपणास प्रत्ययास येते. त्या परिसरात प्रचलित असलेल्या म्हणी, वाक्प्रचार, विशिष्ट असे शब्द त्यांचा वापर लेखकाने अतिशय चपलखपणे केल्यामुळे त्या भाषेतील जिवंतपणा व गोडवा वाढला आहे.
प्रयोगशीलता हे शंकर पाटील यांच्या लेखनाचे एक महत्वाचे वैशिष्टय. शंकर पाटील कथालेखनात सतत प्रयोग करीत राहिले, त्यामुळे त्यांच्या कथेतील नाविन्य, चैतन्य कधीच संपले नाही. कथेच्या अंगभूत घाटाची त्यांना असणारी एक विलक्षण जाण त्यांच्या कथांतून प्रतीत होते.
केवळ कथा लेखनावरच नव्हे तर कथा सादरीकरणावरदेखील शंकर पाटील यांची विलक्षण पकड होती. आपल्या कथाकथन शैलीच्या माध्यमातून ते श्रोत्यांसमोर अनेक पात्रे अक्षरश: जिवंत करत. ऐकणाऱ्याच्या डोळ्यासमोर ती पात्रे, तो प्रसंग, ती घटना उभी राही. व्यक्तिरेखांना अनुरूप अशा आवाजात व्यक्तिरेखा अगदी लीलया सादर करण्याची त्यांची किमया श्रोत्यांना भुरळ पाडी. परिणामी कथालेखन, कथा सादरीकरण वगनाट्य, चित्रपट कथा, पटकथा, संवाद लेखन अशा साहित्य, कला क्षेत्रातील चौफेर मुसाफिरने त्यांनी १९६० ते ८० ही २ दशके अक्षरश: गाजवली. शंकर पाटील यांनी ५९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले होते. ३० जुलै १९९४ रोजी यांचे निधन झाले.
मराठी साहित्यिक, ग्रामीण विनोदी कथालेखक, प्रसिद्ध कथाकथनकार, चित्रपट कथालेखक, पटकथा लेखक, संवाद लेखक म्हणून ७० च्या दशकात महाराष्ट्राच्या घराघरांत अजरामर झालेले आणि आपल्या प्रभावी लेखणीद्वारे त्या काळावर ग्रामीण साहित्याचा ठसा उमवटणाऱ्या, कथालेखनातून आणि कथाकथनातून ६० ते ८० च्या दरम्यानच्या पिढीवर गारुड निर्माण करणाऱ्या ग्रामीण साहित्यात दीपस्तंभ बनून गेलेल्या या प्रसिद्ध मराठी साहित्यिकास त्याच्या जन्म शताब्दीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा !
- रचना माने, कोल्हापूर

🙏🙏🙏
ReplyDelete