सलीम सरदार मुल्ला लिखित 'चांदणटिकल्या' विषयी ....' '

                                    


 


झुक झुक झुक झुक 

आगीनगाडी, 

धुरांच्या रेघा हवेत काढी, 

पळती झाडे पाहूया 

मामाच्या गावाला जाऊ या ....

हे गाणे ऐकताच आपल्याला आठवते ते आपले रम्य बालपण. आणि मामाच्या गावी घालवलेला सुट्टीचा तो रम्य काळ. आपला तो लहानपणीचा काळ आणि मामाच्या गावी घालवलेल्या आपण त्या सुट्ट्या, त्या गोड आठवणी. या साऱ्या आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय आठवणी म्हणजे आपल्या आयुष्यातील अनमोल ठेवाच असतो. त्या आठवणी, ती माणसं, तिथला निसर्ग, खाणं-पिणं, खेळ, मौजमस्ती, गप्पा-गोष्टी, रूढी, परंपरा, या साऱ्यातून कळत-नकळत झालेले संस्कार, मिळालेले ज्ञान या सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येक माणूस हरवून जातो. सलीम मुल्ला यांनी सुद्धा 'चांदणटिकल्या' या ललितगद्याच्या माध्यमातून आपल्या बालपणीच्या रम्य आठवणींना येथे उजाळा दिला आहे.

       लेखक सलीम सरदार मुल्ला (तळंदगे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) हे एक बालसाहित्यकार आहेत. वन विभागात कार्यरत असणाऱ्या सलीम यांनी निसर्गात भटकंती करताना आलेले वैशिष्टय़पूर्ण, कुतूहल वाढवणारे, नवलाईचे काहीसे चमत्कारिक अनुभव शब्दबद्ध करताना निसर्गाला कवेत घेणाऱ्या कविता, बालकथा, ललित लेख, वृत्तपत्रीय लेख असे विविधांगी लेखन सुरू झाले.  अजबाईतून उतराई, अवलिया, ऋतुफेरा, जंगल खजिन्याचा शोध, पेणं आणि चिकोटी अशी ग्रंथसंपदा असणाऱ्या लेखकाला 'युवा साहित्य अकादमी'  पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

       लेखाच्या सुरुवातीलाच लेखक सांगतो की सुट्टीच्या तोंडावर त्याच्या आजोबांचे म्हणजेच नानांचे त्याच्या आईच्या नावे नातवंडांना सुट्टीला घेऊन येण्यासाठी पत्र यायचे. माहेरी जाण्यासाठी आतुर असणारी लेखकाची अम्मी देखील सुट्या पडताच मुलांना घेऊन माहेर गाठायची. लेखकाचे आजोळ उत्तूर. निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेला हा सर्व परिसर. दूरवर पसरलेल्या टेकड्या. हेळा, जांभूळ, धामणी, आईन, किंजळ अशी अस्सल कोकणी झाडे. झाडांच्या फळांचा सुगंध, वाऱ्यामुळे सर्वदूर पसरणारा ओल्या हाळमातीचा, रानफुलांचा सुगंध, पानांफुलांतून, डहाळ्यांमधून मधाळ गाणी गात बागडणारी पाखरं; अशा या रम्य निसर्गाच्या पार्श्वभूमीवर लेखकाचे असणारे अजोळ. ते घर, घरासमोरील आंगण सारंच लेखकाच्या आठवणीच्या कोंदणात घट्ट रुतून बसलेलं.

          महादेवाच्या देवळाच्या पुढच्या वळणावर थोराड अशा चिंचेच्या झाडांच्या व पिंपळाच्या भाऊगर्दीत जुन्या ढंगाचे नानांचे दोन मजली कौलारू घर. घराभोवती निवडुंग, अडुळसा, बोगनवेलीचे दाट कुंपण. थंडीत गुलाबी बहराने भरभरून फुलणाऱ्या किंजळीच्या झाडांची गर्दी, दारासमोरच घडीव दगडांची विहीर. दिवस मावळेपर्यंत रहाट कार्यरत असल्यामुळे तो जणू लयदार गाणेच गात असल्याचा भास व्हायचा. विहिरीच्या कठड्याभोवती पसरलेली वेलबोंडीची लालबुंद वेल, वाऱ्यामुळे खाली पडून फूटणारी टपोरी उंबरे. लेखकाने केलेले हे त्याच्या अजोळचे निसर्ग वर्णन आपल्याला देखील भूतकाळच्या रम्य आठवणीत घेऊन जाते. 

         नेहमी कायद्याचा सल्ला घ्यायला आलेल्या गावकऱ्यांच्या घोळक्यात वेढलेले व कोर्टकचेरीच्या कामाच्या लिखाणात गुंतलेले नाना फुरसत मिळताच अंगणातल्या झाडाफुलात रमत. पाखरांशी हितगुज करत. झाडा-फुलांना मायेने कुरवळणाऱ्या, निसर्गावरती नितांत प्रेम करणाऱ्या नानांचा शीण निसर्गाच्या सानिध्यात क्षणात निघून जायचा. 

         तिन्ही सांजेला वडभावीपर्यंत रोज नियमितपणे फेरफटका मारणाऱ्या नानांसोबत जेव्हा ही त्यांची नातवंडे जात तेव्हा निसर्गातील अनेक बारीक बारीक घडामोडी नाना त्यांना सांगत. परिणामी निसर्गातील अनेक गोष्टींचे ज्ञान त्यांना होत असे. ऐन्याच्या लाकडापासून शेतीसाठी औत बनवतात, सीताफळीच्या झाडाला कीड लागत नाही, विंचू चावला की वडाचा चीक लावतात, घोड्याला थंडी झाली की चिव्याचा पाला देतात यासारख्या अनेक गोष्टींची माहिती लेखकाला नानांमुळे झाली. अनेक पक्षांची, झाडा-फुला-पानांची, त्यांच्या विविध गुणधर्मांची, उपयोगाची ओळख लेखकाला नानांमुळे झाली. आंब्याच्या पानांची पिंपाणी, कोयीची भिंगरी करून देणाऱ्या नानांमुळे निसर्गातील अनेक गोष्टींच्या साह्याने खेळ खेळण्यास लेखक शिकला. नाना नातवंडांना हुमान घालून त्यांच्या बुद्धीला चालना द्यायचे. 

        लेकीं-नातवंडानी घर गजबजले की नानीच्या उत्साहाला देखील उधान यायचे. एरवी सतत शेतीच्या कामांमध्ये गुंतून पडलेली नाणी आता सवड काढून घरी राहायची. नातवांना गोडधोड करून घालायची. लेखक म्हणतो कुबेराच्या पंचपक्वानाला लाजवेल अशी नाणीच्या स्वयंपाकाला लज्जत असायची. नानीच्या हातचे उडदाचे डांगर, नाचणीची भाकरी, खमंग आळुच्या वड्या, कच्चा करवंदाचे लोणचे, तिळकुटाची चटणी, ताकात कुस्करलेली रताळे, भाजलेल्या चवळीच्या शेंगा, साखरे टाकलेली पिकली बंपरे, घोळीची भाजी, उंबराच्या फळांची भाजी, केळीच्या कोंबाची भाजी अशा कितीतरी पदार्थांची चव लेखकाच्या जिभेवर आजही रेंगाळते आहे. पोट भरल्यानंतर नातवंडांनी दिलेले ढेकर ऐकून सुरकुतलेला चेहरा मोहरलेली नानी मग कुठे आपल्या डबीतील भाजकी काळीकुट्ट मिशरी लावत थोडासा विसावा घ्यायची. 

           उन्हाळी सुट्टीच्या दिवसात ही सगळी बच्चे कंपनी लहान मामा सोबत रानात जायला उतावीळ असायची. घामेजलेल्या अंगाची ही सर्व मंडळी सूर्य मावळेपर्यंत तळ्यात मनसोक्त डुंबायची. तळ्याकाठच्या बकुळीच्या झाडाला आलेला नाजूक फुलांचा बहर म्हणजे जणू लेखकाला चांदणटिकल्याच वाटायच्या. या चांदनटिकल्या नानांसाठी आठवणीने ओंजळीत घेऊन जेव्हा ही मंडळी घरी परतायची तेव्हा नाना-नानी वाटच बघत बसलेले असायचे. 

          मोठेपणी निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या लेखकाला जेव्हा एका पुस्तकात लहानपणी ठेवलेली बकुळीची सुकली फुले मिळतात तेव्हा लेखकाच्या नजरेसमोर आजोळचा निसर्ग पुन्हा उभा राहतो व त्याच वेळेला नानांचे शब्द आठवतात ते म्हणजे, 'निसर्ग नुसता पुस्तके उघडून कळत नाही तर त्यासाठी सतत डोळे उघडे ठेवून अनवर पावलाने निसर्गात भटकले पाहिजे.' अण्णांच्या या शिकवणीची आठवण होताच लेखक पुस्तक मिटतो व आपले आजोळ गाठतो. तिथे गेल्यानंतर बालपणीच्या आठवणींनी हळवा झालेला लेखक म्हणतो, की आज नाना-नानी हयात नाहीत, अंगणाची रया गेली आहे, झाडांना वाळवी लागली आहे, पाखरे मुकी झाली आहेत, रहाट गंजून गेला आहे, गोठ्यातील गुरेढोरे कधीच विकली गेली आहेत, शेतात रान माजले आहे, तळ्याकडचा बकुळ वृक्ष सुसाट वाऱ्यामुळे मुळासकट उन्मळून पडला आहे; आज पूर्वीसारखं इथं काहीच नसलं तरी त्या आठवणी मात्र अजूनही तशाच आहेत- मनाच्या कुपीत जपलेल्या.

                                    रचना माने, कोल्हापूर


                                

Comments

Popular posts from this blog

ग्रामीण कथाकार शंकर पाटील यांना आठवताना….