अण्णाभाऊ साठे यांच्या कथा-कादंबऱ्यातील स्त्रीजाणिवा

 


              
अण्णाभाऊ साठे हे स्वातंत्र्योत्तर काळातील एक अत्यंत महत्त्वाचे असे साहित्यिक. आपल्या प्रचंड व तितक्याच दर्जेदार अशा लेखणाने त्यांनी मराठी साहित्यविश्वात स्वतःचे आढळ स्थान निर्माण केले. केवळ दीडच दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ चार भिंतीच्या शाळेत शिकले नाहीत पण जगाच्या शाळेत आलेल्या अनुभवांनी त्यांना खूप काही शिकवले व तेच त्यांनी शब्दबद्ध करून साहित्यशारदेच्या चरणी अर्पण केले.

आपल्या वैविध्यपूर्ण व दर्जेदार अशा साहित्य निर्मितीद्वारे अण्णांनी मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले. त्यांचे साहित्य २७ भाषांमध्ये भाषांतरीत झाले आहे. सामाजिक क्रांती घडवून आणणारा लोकशाहीर म्हणून अण्णाभाऊंचा जेवढा गौरव होतो तितकेच कथा-कादंबरीकार म्हणूनही त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. माणूस व माणसाचे जगणं हा त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू आहे. कष्टकरी, सामान्य माणसाच्या जगण्याचे वास्तव चित्र, जगण्यासाठीचा त्यांचा जीवन संघर्ष त्यांनी चित्रित केला. लढाऊ वृत्तीने जीवन जगणाऱ्या त्यांच्या पात्रांचा पिंड कणखर, जीवनाशी दोन हात करणारा आहे. गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, श्रमिक, दलित, शोषित, वंचित, उपेक्षित, पिचलेल्या समाजाच्या व्यथा-वेदनांना त्यांनी शब्दरूप दिले. माणसाचे वास्तव जीवन, त्यांच्या जगण्याच्या तऱ्हा, त्यांचे मन, भावना, यांचा संघर्ष, त्यांची संस्कृती, त्यांच्यातील विकृती, पश्चाताप, आशा-निराशा या साऱ्यांचे मूलगामी दर्शन त्यांनी आपल्या साहित्यातून घडवले. दुःख, दारिद्र्य, दैन्य यांच्याशी संघर्ष देत जगणाऱ्या स्वाभिमानी माणसांना त्यांनी नायक केले.

अण्णाभाऊंच्या साहित्यात व्यक्त होणाऱ्या स्त्री जाणीवांचा शोध घेताना लक्षात येते की, त्यांचे साहित्य जसे पुरुषप्रधान आहे तसेच स्त्रीप्रधानही आहे. त्यांची नायिका कथाविश्व व्यापून टाकते. भिन्न-भिन्न जातीतील, वर्गातील, समाजातील, आर्थिक स्तरातील स्त्रियांचा जीवन संघर्ष त्यांनी चित्रित केला. समस्त स्त्रीजातीच्या समस्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नायिका रेखाटताना त्यांनी नायिकेचे पारंपरिक दर्शन नाकारले. मनस्वी जीवन जगणारी त्यांची नायिका काही बाबतीत हतबल होत असली तरी, सामाजिक बंधनांमध्ये जखडलेली असली तरी, नैतिक मूल्यांची जपणूक करणारी, कौटुंबिक जिव्हाळा जपणारी, दारिद्र्यातही स्वाभिमानाने जगणारी, स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी, अस्मितेसाठी झगडणारी, जगण्याच्या हक्काची पायमल्ली होतात खवळून उठणारी, पेटून उठणारी, परिस्थितीच्या रेट्यात पाय रोवून भक्कमपणे उभी राहणारी आहे. प्रसंगी स्पष्ट व रोखठोक प्रश्न विचारून विचारप्रवृत्त करणारी आहे. मराठी साहित्यविश्वाला यापूर्वी ज्ञात नसलेली आगळीवेगळी नायिका त्यांनी रेखाटली. स्त्री सहिष्णूतेचे नवे भान समाजाला देण्याचा प्रयत्न केला.

              'वारणेच्या खोऱ्यात' या कादंबरीत मंगला या क्रांतिकारी स्त्रीच्या करारीपणाचे व देशप्रेमाचे चित्रण आले आहे. या कादंबरीला वारणेच्या खोऱ्यातील स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी आहे. देशद्रोह्याबरोबर लग्नाला ठाम नकार देताना ती स्वातंत्र्यसैनिक हिंदुरावशी लग्न करते. त्याच्या बरोबरीने हातात बंदूक घेऊन इंग्रजांशी लढते. वेळ येताच स्वतःचे बलिदानही देते. ती जितकी कोमल, मृदू, दयाळू तितकीच निश्चयी, कठोर, पराक्रमी, देशावर निष्ठा असणारी आहे. स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या स्त्री स्वातंत्र्यसैनिकांची प्रतिनिधी म्हणून ती या कादंबरीत येते.

             ग्रामीण कुटुंबामध्ये स्त्रियांच्या सुखस्वप्नांचा, तिच्या भावभावनांचा कसा चुराडा होतो, त्यात ती कशी पिचली जाते, तिची मानसिक-भावनिक घुसमट कशी होते, त्यातून एखादी पेटून उठली, तिने बंड करून एखादा निर्णय घेतला, कृती केली तर त्याची परिणिती किती भयानक होते याची प्रचिती देणारी 'आवडी' ही कादंबरी. फसवून गळ्यात बांधलेल्या फेफरे येणाऱ्या नवऱ्याचा त्याग करून दुसऱ्याबरोबर स्वेच्छेने सुखी संसार करणाऱ्या बहिणीचा अनिष्ट अशा सामाजिक रूढी-परंपराचा पगडा असणारा तिचा भाऊ बिनबुडाच्या, पोकळ सामाजिक प्रतिष्ठेच्या आहारी जाऊन कपटाने, दगाबाजीने खून करतो. इथे बहिणीवरचे प्रेम, माया महत्त्वाची ठरत नाही. तर पोकळ अशी जातीची प्रतिष्ठा, घराण्याची अब्रू वरचढ ठरते व एक निष्पाप जीव जातिआधारित व्यवस्थेचा हाकनाक बळी जातो.

             जातिव्यवस्थेच्या या उतरंडीमध्ये  शुद्रातिशूद्र समजली जाणारी स्त्री कायमची पिचली जाते मग ती भलेही उच्चवर्णीय असो. शूद्र स्त्रीला तर दुहेरी शोषणाला सामोरे जावे लागते. सामाजिक पातळीवर ती जातीय शोषणाला बळी ठरते. तर कौटुंबिक पातळीवर तिला पुरुषी शोषणाला सामोरे जावे लागते. सामाजिक स्तरावर शोषित असणारा दलित पुरुष कौटुंबिक पातळीवर मात्र स्त्रीचा शोषक होतो. आणि शोषित म्हणून होणारी घुसमट, वाट्याला येणारे दुःख, वेदना, अपमान, अवहेलना सोयिस्करित्या विसरतो. 'न स्त्री स्वातंत्र्य अर्हती' या मनूच्या वचनामुळे तर उच्चवर्णीय स्त्री जीवन नेहमीच कमालीचे जखडलेले दिसते. वडील, नवरा, मुलगा या तीन पुरुषांच्या आधारानेच आणि त्यांच्या निर्णयाप्रमाणेच स्त्रीने जीवन जगणे बंधनकारक करणाऱ्या या समाज व्यवस्थेत एक उच्चवर्णीय आवडी जातीचे सर्व पाश तोडून तथाकथित खालच्या समाजातील नायकाबरोबर प्रेमविवाह करते ही गोष्टच त्या उच्चवर्णीय समाजाला, तिच्या उच्चवर्णीय कुटुंबाला कलंक वाटते. स्त्रीला नेहमी तुच्छ समजणाऱ्या पुरुषप्रधान व्यवस्थेला, स्त्रीच्या जीवनाची सारी सूत्रे स्वतःच्या हातात घेऊन तिला कळसुत्री बाहुली प्रमाणे स्वतःला हवं तसं नाचवणाऱ्या, तिलाही मन आहे, भावना आहेत, तिलाही तिचे स्वतःचे आयुष्य स्वेच्छेने जगण्याचा अधिकार आहे याचे यात्किंचितही भान नसणाऱ्या पुरुषप्रधान व्यवस्थेला तिचे हे बंड अजिबात मान्य होणारे नव्हते, पचणारे नव्हते. आज एक आवडी निर्माण झाली उद्या अशा असंख्य आवडी निर्माण होतील व आपली जात, वंश भ्रष्ट होईल या बिनगुडाच्या भीतीपायी, जातीच्या खोट्या प्रतिष्ठेपायी, भविष्यात पडू पाहणारा पायंडा वेळीच मोडून काढण्यासाठी, समाजात धाक निर्माण करण्यासाठी आवडीला आडवी पाडणे त्यांना गरजेचे वाटते. रक्ताच्या नात्यापेक्षा समाजातील तथाकथित बेगडी प्रतिष्ठा महत्त्वाची वाटते. परिणामी रक्ताच्या नात्याचा, काळजाच्या नात्याचा अतिशय निष्ठुरपणे घोट घेतला जातो, बळी दिला जातो. आणि खेदाची बाब म्हणजे जाती व्यवस्थेचे, तथाकथित उच्च निच्चतेचे, भ्रमक प्रतिष्ठेचे हे भूत आजही, अजूनही लोकांच्या मानगुटीवर बसलेले आहे. आजही जातीबाहेर लग्न करणाऱ्या अशा अनेक आवडींचा बळी जातो; तोही स्वतःच्याच माणसांकडून. अण्णाभाऊंनी येथे जातीभेदाच्या भिंती मोडण्याचा प्रयत्न केला आहे.

'वैजयंता' ही तमाशा कलावंतांच्या जीवनावर आधारित असलेली कादंबरी. तमाशा कलावंतांचे उपेक्षित जिणे, त्यातील स्त्रियांची असणारी दयनीय अवस्था, लोकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, अपमान, अवहेलना, मानहानी सहन करूनही सन्मानाने जगण्यासाठीची त्यांची धडपड, त्यांचा अंतर्मन व बाह्य जीवन यातील संघर्ष ही कादंबरी चित्रित करते. नायिका वैजयंताचे आईच्या हट्टापायी एकदाच तमाशात नाचणे तिच्या अख्ख्या आयुष्याचा तमाशा करून टाकते. ती तमाशात नाचणारी स्त्री असली तरी शीलवान आहे, चारित्र्यसंपन्न आहे. तिलाही स्त्रीसुलभ भावना आहेत. तमासगिरीण म्हणून कोणाची जीभ सैल झाली, कुणी खालच्या पातळीला जाऊन बोलला तर प्रसंगी त्याला स्पष्ट शब्दात खडसावणारी, खडे बोल सुनावणारी आहे. तमाशा कलावंतांविषयी लोकांच्या मनात असणारा समज, खरंतर गैरसमज तिला अजिबात मान्य नव्हता. लोकांनी या क्षेत्राकडे नेहमीच कलुषित नजरेने पाहिले, या क्षेत्राला कधीच समाजमान्यता प्राप्त झाली नाही, सामाजिक प्रतिष्ठा लाभली नाही. अजूनही या क्षेत्राबद्दल लोकांच्या मनात अढी आहे. ज्या क्षेत्राचा उल्लेख नेहमीच कुचेष्टेने व उपहासाने केला जातो अशा क्षेत्रात वावरुनही आपले शील, अब्रू जपणाऱ्या एका स्वाभिमानी, मनस्विनी स्त्रीची ही यशोगाथा आहे.

'चिखलातील कमळ' ही मुरळीच्या जीवनावर आधारित कादंबरी. मुरळीच्या पोटी जन्म झाला म्हणून मुरळीचे जीवन जगणारी-सीता. भारतीय समाजमनाचे हे भयानक वास्तव आहे की जिथे, ज्या समाजात माणसाचा जन्म होतो ते जीवन त्याच्या वाट्याला येते. अलीकडच्या काही वर्षात या परिस्थितीत थोडा बदल झाला असला तरी अगदी ६०-७० वर्षांपूर्वीपर्यंत हेच विदारक चित्र समाजात पहावयास मिळायचे. कुठे जन्म घ्यायचा हे माणसाच्या हातात नसल्याने या सामाजिक बंधनांच्या पार्श्वभूमीवर वाट्याला आलेले जीवन इच्छा असो वा नसो ते त्याला अपरिहार्यपणे/ नाईलाजाने स्वीकारावे लागायचे. अशीच ही नायिका. मुरळीच्या पोटी जन्म झाला म्हणून मुरळीचे जीवन वाट्याला आलेली-सीता. देखणी व बळीवर मनस्वी प्रेम करणारी.

लहानपणीच खंडोबाशी लग्न लावलेली सीता मोठी झाल्यावर आईला प्रश्न विचारते, 'ज्या देवाचं आईशी लग्न होतं त्याच देवाचं तिच्या मुलीशी लग्न होऊ शकतं का?' खरंतर तिने आईला विचारलेला हा प्रश्न समस्त व्यवस्थेला विचारलेला जाब आहे, व्यवस्थेला दिलेली एक चपराक आहे. देवाच्या नावावर, लोकांच्या भोळ्या श्रद्धेचा फायदा घेऊन समाजात देवदासी सारख्या अनेक अनिष्ट रूढी-परंपराच्या माध्यमातून, त्या परंपरांच्या आडोशाने स्त्री जीवनाचा मांडला जाणारा जो बिनबोभाट बाजार आहे त्याचा पडदा फाडून त्या व्यवस्थेला उघडे पाडण्याचा, निरुत्तर करण्याचा प्रयत्न हा प्रश्न करतो. खरे तर आईचे लग्न जर देवाशी झाले असेल तर ती देवाची मुलगी होते. मग त्या देवाशी पुन्हा त्या मुलीचेही लग्न लावून देऊन बाप-मुलीचे लग्न ही निषिद्ध असणारी गोष्ट समाज कशी काय करतो? आणि त्याही पुढे जाऊन देवाची बायको म्हणून जगताना तिच्या मनाचे काय? असा सर्व समाजाला निरुत्तर करणारा; देवाच्या, श्रद्धेच्या नावाखाली वासनेने वखवखलेल्या समाजाचा बुरखा फाडणारा प्रश्न ती करते आहे. ती फक्त प्रश्न विचारून गप्प बसत नाही तर अतिशय धाडसाने पिढ्यानपिढ्या स्त्री जीवनाचा बाजार मांडणाऱ्या, 'कुणीही यावे टिकली मारून जावे' असा तिच्या आयुष्याचा दशावतार करणाऱ्या, दुर्दशा करणाऱ्या अशा अनिष्ट प्रथेवरच ती घाला घालते. मुरळीची मुलगी मुरळी होणार हा समाजाने घालून दिलेला दंडक, कित्येक वर्षाचा पायंडा ती मोडते व बळीसोबत लग्न करते.

'बरबाद्या कंजारी' या कथेतील आजारी मुलाबरोबर लग्न झाल्याने तरुणपणीच विधवा झालेली बरबाद्याची मुलगी निल्ली हैदऱ्याबरोबर पळून जाते. स्वतःच्या नैसर्गिक भावभावनांना मारून न टाकता त्यांच्या पूर्तीसाठी जमातीच्या नियमांविरुद्ध जाऊन स्वेच्छेने निर्णय घेणारी, त्याप्रमाणे कृती करणारी बंडखोर नायिका निल्लीच्या माध्यमातून अण्णांनी रेखाटली. लेकीच्या बंडखोरीमुळे जमातीकडून वाळीत टाकलेला, हुक्कापाणी, रोटीबेटी व्यवहार बंद झालेला बेदरकार बरबाद्या जमातीच्या दबावाला बळी न पडता निडरपणे लेकीच्या निर्णयाला पाठिंबा देतो.

'आबी' या कथेत खोटंनाटं सांगून लग्न मोडणाऱ्या बकाजीमुळे वयस्कर दरोडेखोर माणसाशी लग्न करायला लागलेली आबी लग्नानंतर पहिल्याच दिवशी नवऱ्याला दरोड्याबद्दल अटक झाल्याने माहेरी परतते. तुरुंगातून सुटल्यावर तिच्यावर मालकी हक्क दाखवून दिला जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवऱ्याला 'मला चोराघरी नांदायचं न्हाय' म्हणून ठामपणे नकार देते. एवढंच नाही तर 'हे कुंकू मला नको' म्हणून आपल्या कपाळीचं सौभाग्याचं प्रतीक असणारं कुंकू पुसते. समाजामध्ये वावरताना वासनागांध, वखवखलेल्या पुरुषी नजरांपासून वाचण्यासाठी अनेक विधवा कपाळाला कुंकू, टिकली लावताना व गळ्यात मंगळसूत्र घालताना दिसतात. दारुडा, लुळा, पांगळा, अंथरुणाला खिळलेलाच का असेना वखवखलेल्या नजरांपासून रक्षणासाठी म्हणून कुंकवाचा धनी असावा अशी समाजाची धारणा आजही दिसून येते. पुरुषांमुळे सतत धास्तावलेले, भीतीच्या छायेत वावरणारे स्त्रीमन त्यांच्या आयुष्यात पुरुषाच्या असण्यामुळे कळत-नकळत निर्धास्त होते. पण स्वतःवर पूर्ण विश्वास असणारी खंबीर आबी मात्र पुरुषाचं तथाकथित आधाररुपी छत, त्याची सोबतच नाकारते. तसेच ज्याने तिचे आयुष्य नासवले त्या बकाजीचाही डोक्यात दगड घालून जीव घेते. आपल्यावरील अन्याय निमुटपणे सहन न करता, तसेच पदरी पडलं पवित्र झालं म्हणून दरोडेखोर नवऱ्याचा स्वीकारही न करता त्याविरुद्ध बंड करते. आपल्यावरील अन्यायाचा बदला घेते. आणि आनंदी अन् शांत मनाने नव्याने आयुष्याला सामोरी जाते.

             अण्णाभाऊंच्या नायिका चित्रणात कमालीचे वैविध्य दिसते. त्यांचे जग भलेही समस्यांनी घेरलेले असले तरी त्या डगमगत नाहीत. परिस्थितीशी दोन हात करून मार्ग काढतात. दैववादी, हतबल न बनता प्रसंगी बंड करून, रुढी-परंपरांची सर्व बंधने झुगारून देऊन, स्वतःच्या जीवनाला इच्छित आकार देतात. प्रचंड दारिद्र्यातही त्यांनी आपला स्वाभिमान सोडलेला नाही. त्या केवळ कचकड्याच्या बाहुल्या नाहीत तर रणरागिनी आहेत.

एकूणच अण्णाभाऊंच्या साहित्यात व्यक्त झालेल्या स्त्री जाणिवांचा, स्त्री संवेदनांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा लक्षात येते की स्त्रियांवर अन्याय, अत्याचार करणारी, त्यांच्या नैसर्गिक भावभावनांना पायदळी चिरडणारी, त्यांचे भावविश्व उध्वस्थ करणारी ही प्रस्थापित पुरुषप्रधान व्यवस्था उलटून टाकून, माणूसपणाचे मूल्ययुक्त जीणे स्त्रियांच्या वाट्याला यावे, तिला तिचे न्याय्य हक्क मिळावेत, तिच्या मनाचा, भावभावनांचा विचार व्हावा, तिला समाजात व कुटुंबात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी यासाठी स्त्रीवादी चळवळीने जो लढा १९७५च्या दरम्यान दिला व १९८० नंतर तो अधिक मुखरपणे साहित्यात आविष्कृत झाला त्या स्त्रीवादी विचारांचे प्रतिबिंब अण्णाभाऊंच्या साहित्यात १९४९-६९ या काळातच पडलेले दिसते.

स्त्रीवाद ही संकल्पना भारतात येण्याअगोदर, रुजण्याअगोदर या नायिकांना त्यांच्या हक्काची, स्वतःच्या नैसर्गिक भावभावनांची होणारी जाणीव, त्यासाठी त्यांनी पुकारलेले बंड, स्वजीवनाला इच्छित आकार देण्याचा केलेला प्रयत्न, दैववादी बनून वाट्याला आलेले भोग निमूटपणे सहन न करता प्रयत्नपूर्वक स्वतःचे जीवन बदलण्याचा केलेला प्रयत्न त्यांच्यातील स्त्रीवादी जाणीव अधोरेखित करतो. स्वतःच्या जीवनावर स्वतःचाच हक्क, स्वतःच्या शरीरावर स्वतःचाच हक्क हे स्त्रीवादी तत्त्व आवडी, सीता, वैजयंता, आबी, मंगला या नायिका खरोखरच जगतात. आणि हे तत्त्व या नायिकांच्या माध्यमातून साकार केले ते लेखक अण्णाभाऊ साठे काळाच्या किती पुढचा विचार करतात हे आपणास दिसून येते. त्यांनी स्त्रीकडे नेहमीच माणूस म्हणून पाहिले. माणूस म्हणून तिच्या भावभावनांचा, तिच्या मानसिक घुसमटीचा, तिच्या मनातील वादळांचा ते सहानुभूतीपूर्वक विचार करतात. नीती-अनितीच्या  चौकटीच्या पुढे जाऊन माणूस म्हणून तिचा विचार करतात. स्त्रीवाद स्त्रीची सर्व प्रकारच्या जोखडातून, शोषणातून मुक्ती अपेक्षितो. स्त्रीमुक्ती पर्यायाने मानवमुक्ती. व मानवमुक्तीच्या लढ्यात सम्यक क्रांतीचे तत्त्वज्ञान घेऊन उभा असणारा साहित्यिक म्हणजे अण्णाभाऊ साठे.                                                                                                                                                       डॉ. रचना माने                                                                 कोल्हापूर

                                                                                                                   

Comments

Popular posts from this blog

ग्रामीण कथाकार शंकर पाटील यांना आठवताना….