शिक्षक - विद्यार्थी नातेसंबंधाचा हृद्य आविष्कार 'झेल्या' व 'चितळे मास्तर'

        साहित्यात मानवी जीवनाचे प्रतिबिंब पडलेले असते. मानवी जीवनातील विविध नात्यांचा, त्यांच्या विविध छटांचा अतिशय भावपूर्ण आविष्कार साहित्यात शब्दबद्ध झाल्याचे दिसून येते. मानवी जीवनाला आकार देणारे, मानवी जीवनावर प्रभाव टाकणारे असेच एक महत्त्वपूर्ण नाते म्हणजे शिक्षक व विद्यार्थी होय. या नात्याच्या बऱ्या-वाईट छटा साहित्यात चित्रित झाल्या आहेत. गौरी देशपांडे यांच्या 'दुस्तर व घाट' या कादंबरीतील हरिभाऊ हे प्राध्यापक आपली आवडती विद्यार्थीनी नमूची आपल्या मुलासाठी निवड करून तिला आपली सुन बनवतात. आशा बगे यांच्या 'भूमी' कादंबरीतील मैथिलीचे पीएच.डी. चे गाईड डॉ. अरूणाचलम यांची पत्नी त्यांना सोडून गेल्याने कित्येक वर्षापासून भासणारी सहजीवनाची, स्त्री सहवासाची उणीव आपल्या विद्यार्थीनींना केलेल्या ओझरत्या स्पशनि भरून काढण्याचा प्रयत्न करत. ही मर्यादा ते कधी ओलांडत नसल्याने विद्यार्थीनीही त्यांच्या या वर्तनाकडे दुर्लक्ष करतात. निशिकांत गुरव आपल्या 'बदली' कथेद्वारे अनैतिक संबंधात अडकलेल्या नायकवडी मास्तरांद्वारे, विद्यार्थ्यांना आपल्या शेतात कामासाठी नेणाऱ्या पवार मास्तरांद्वारे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या प्रवृत्तीचे दर्शन घडवितात. शिक्षक-विद्यार्थी नातेसंबंधावर भाष्य करणाऱ्या आणखीही साहित्यकृती आहेत. पण ही काही प्रातिनिधिक उदाहरणे. या पार्श्वभूमीवर मराठी साहित्यातील दोन कथा शिक्षक-विद्यार्थी हृद्य नात्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण भाष्य करतात. या कथा म्हणजे 'झेल्या' व 'चितळे मास्तर'.

          उत्तम वाङ्‌मयीन गुणांमुळे मराठी साहित्यात स्वतःचे आढळ स्थान निर्माण केलेली, मराठी कथाविश्वात ध्रुवतारा बनून राहिलेली कथा म्हणजे व्यंकटेश माडगूळकरांची 'झेल्या'. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात शिक्षणाचे महत्त्व समाजमनावर फारसे न ठसलेल्या कालखंडाच्या पार्श्वभूमीवर लिहीलेली ही कथा समग्र मराठी साहित्यात आपलं वेगळं व आढळ स्थान निर्माण करून आहे ती त्यातील शिक्षक-विद्यार्थी यातील हृद्य नातेसंबंधामुळे. कथेच्या सुरवातीलाच नवीन मास्तरांबद्दल अंदाज बांधणारी निरागस मुले भेटतात. जालंदर एकनाथ लोहार उर्फ झेल्या त्यातीलच एक. झेल्या शाळेला बऱ्याचदा गैरहजर असतो. जबरदस्तीने शाळेस नेणाऱ्या मित्रांना आई-बहिणीवरून शिव्या देतो. नवीन शिक्षकांशी गुर्मीत बोलतो. शाळा चुकवण्याच्या खोट्या सबबी सांगतो. वडिलांचेही ऐकत नाही. बिडी ओढतो. मारकुट्या मास्तराला शिव्या देतो. असा हा झेल्या सुरवातीस आठवडाभर नवीन मास्तरांसोबत हजर-गैरहजरीचा पाठशिवणीचा खेळ खेळतो. पण नंतर मात्र नियमित शाळेत उपस्थित राहतो. एवढेच नाही तर मास्तरांचा पट्टशिष्य बनतो. झेल्याचा आडदांडपणा, उनाडपणा या सगळ्याकडेच दुर्लक्ष करून सुरवातीपासूनच झेल्याशी मायेने, आपुलकीने बोलणारे गुरूजी त्याच्यावर कधीही रागवत नाहीत. झेल्या मास्तरांचा तिथल्या उदास, एकलकोंड्या आयुष्याचा साथीदार बनतो. सुरवातीला मास्तरांकडे झोपायला येणारा झेल्या पुढे २४ तास जणू मास्तरांची सावलीच बनून राहतो. मास्तरांची सर्व कामे जातीने करू लागतो. त्याच्या बाळबुद्धीच्या प्रश्नांनी मास्तरांनाही हसू येई व थोडा विरंगूळाही वाटे. तात्पुरत्या काळासाठी आलेले आपले आवडते मास्तर शाळा सोडून जाणार या घटनेने खिन्न होतो. मास्तरांसोबत जायची इच्छा बाळगतो. मास्तर जाताना इतर मुलांप्रमाणे त्यांना वेशीपर्यंत सोडून मागे न फिरता मास्तरांबरोबर अट्टाहासानं निबंवडे गावच्या हद्दीपर्यंत जातो. मास्तरांच्या गळ्यात पडून रड-रड रडतो. पुन्हा कधीच त्या शाळेत न जाण्याची भीष्मप्रतिज्ञा करतो. परत जाताना अंगरख्याच्या बाहीने डोळे पुसत सतत मागे वळून मास्तरांकडे पाहतो. आपल्यासोबत येण्याचा हट्ट करणाऱ्या झेल्याला बेरोजगारीमुळे, परिस्थितीमुळे सोबत नेऊ शकत नसलेले आगतिक मास्तर झेल्याची तालुक्याच्या गावी आपल्याकडे मोठ्या शाळेत येण्याची समजूत घालतात. गळ्यात पडून रडणाऱ्या झेल्याच्या पाठीवरून मायेनं हात फिरवून, त्याची समजूत काढून त्याला परत पाठवतात. झेल्या झुडपाआड दिसेनासा होईपर्यंत त्याच्याकडे पाहत राहतात. तो दिसेनासा झाल्यावर मगच आपण निघून जातात. कित्येक वर्षानंतरही त्यांच्यातील भावबंधाामुळे, हृद्य नातेसंबंधामुळे मास्तरांच्या आठवणीत झेल्या कायम राहतो.

           मरकुट्या शिक्षकांमुळे शिक्षणापासून दुरावलेला उनाडक्या करण्यातच धन्यता व आयुष्याची इतिकर्तव्यता मानणारा एक विद्यार्थी व सुरुवातीपासूनच थोडं नमतं घेत आपल्या मायेनं, प्रेमानं त्याचं मन जिंकणारे, त्याला पुन्हा शिक्षणाकडे वळविणारे, त्याच्यात शिक्षणाबाबत गोडी निर्माण करणारे मास्तर यांच्यात हळूहळू निर्माण झालेले जिव्हाळ्याचे, आपुलकीचे, प्रेमाचे हृद्य नाते वाचकाला अंतर्मुख बनवते. पण मास्तर शाळा सोडून जाणार व पूर्वीचेच मारकुटे मास्तर पुन्हा शाळेत येणार या गोष्टीमुळे त्याचे दुःखी होणे, मास्तरांबरोबर जाण्याचा हट्ट करणे, पण ते शक्य नाही याची जाणीव होताच आपल्या आवडत्या मास्तरांच्या माघारी शाळेची पायरीही न चढण्याची भीष्मप्रतिज्ञा करणे व त्याला जवळून ओळखणाऱ्या मास्तरांनी तो त्या पद्धतीनेच वागला असणार हे वर्तवलेले भाकीत व त्यानुसार कल्पिलेले त्याचे वर्तमान आयुष्याचे चित्र वाचकाला हेलावून टाकते. कथेचा शेवट वाचकाला हळवा तर बनवतोच पण शेवटी त्याची होणारी ताटातूट वाचकाला अस्वस्थ बनवते; झेल्याच्या पुढील आयुष्याचे, शिक्षणाचे काय? असा भला मोठा प्रश्न उपस्थित करते. शिक्षक व विद्यार्थी यातील अत्यंत हृद्य नातेसंबंधामुळे, त्यांच्यात निर्माण झालेल्या भावबंधामुळे 'झेल्या' ही कथा मराठी साहित्यविश्वात अजरामर झाली आहे.

         पु. ल. देशपांडे यांची 'चितळे मास्तर' ही कथा अशीच शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील अनोखे भावबंध थोड्या मिस्किलपणे व्यक्त करणारी. चितळे मास्तरांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचा स्वभाव, सवयी, शिकवण्यातील तळमळ, प्रत्येक विद्यार्थ्यांशी असणारे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध, स्वतःच उभं आयुष्य शिक्षकी पेशासाठी खर्चणे, मिस्कील स्वभावाआड लपलेला त्यांच्या मनाचा हळवेपणा या साऱ्याचं अतिशय प्रत्ययकारी चित्रण पु. ल. देशपांडे यांनी 'चितळे मास्तर' या कथेत केले आहे. शाळेचे नाव गोपाळ कृष्ण गोखले असूनही तिचे चितळे मास्तरांची शाळा म्हणून ओळखले जाणे यावरून चितळे मास्तरांनी शाळेला दिलेले योगदान, शाळेसोबतचे त्यांचे दृढ नाते अधोरेखित होते. आपल्या मुलाला चितळे मास्तरांच्या हवाली करून आई-बापांचे निर्धास्त होणे त्यांचा मास्तरांवरील विश्वास व्यक्त करते. मुख्य विषय इंग्रजी असूनही ड्रॉइंग सोडून सर्व विषय शिकवण्यात हातखंडा असणारे, रंगात येऊन, भान हरपून तन्मयतेने साभिनय शिकवणारे, वाक्याचा शेवटचा शब्द विद्यार्थांकडून बदवून घेणारे, शाळेतील हुशार व ढ मुलांची घरी शिकवणी घेणारे, त्यांना प्रेमाने खाऊ घालणारे, विद्यार्थ्यांशी थट्टामस्करीच्या सुरात बोलणारे, त्यांच्याशी आपलेपणाचे व जिव्हाळ्याचे नाते जपणारे, घोकंपट्टी- पाठांतरावर ठाम विश्वास असणारे, वर्गात विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर जीवनाच्या ज्ञानाचे धडे हसत-खेळत देणारे, शिस्तीचा बडगा न वापरणारे, प्रेमळ शब्द न वापरता विद्यार्थ्यांवर केवळ प्रेमच करणारे, पुढील शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणारे, विद्यार्थीनीच्या पाठवणीवेळी बापाप्रमाणे हळवे होणारे, काळानुरूप बदलणारे, शाळेत ओपन थेटर बांधण्यासाठी प्रयत्नशील असणारे, त्यासाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी जमवण्यासाठी स्वतः पायपीट करणारे, विद्यार्थ्यांना विविध नाट्यस्पर्धांना पाठवणारे, स्वतः नाटकाचे दिग्दर्शन करणारे, लेखन अभ्यासाची शिस्त मुलांच्या नसानसात भिनवणारे, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक प्रगतीचीही खडानखडा माहिती असणारे, शाळेतच चपला विसरणारे, शाळा सोडून कित्येक वर्षे झालेल्या माजी विद्यार्थ्यांशी आपुलकी, जिव्हाळ्याचे स्नेहसंबंध जपणारे, विद्यार्थी किती मोठ्या पदावर असला तरी त्याच्याशी पूर्वीच्याच खोडकर भाषेत बोलणारे, स्वतःच्या विल्सन कॉलेजच्या आठवणीने हळवे होणारे, विद्यार्थी मुकुंदाच्या पोलीओने बिछाण्यावर असलेल्या पाच-सहा वर्षाच्या मुलीला तल्लिनतेने साभिनय गोष्ट सांगणारे, विद्यार्थ्यांशी केवळ त्यांच्या शालेय जीवनातच नव्हे तर आयुष्यभर हृद्य भावबंध जोडणारे, तसेच विद्यार्थ्यांच्या घरच्यांबरोबरही जिव्हाळ्याचे नातेसंबंध जोडणारे चितळे मास्तर वाचकांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतात. वाचकांशीही एक हृद्य नाते निर्माण करतात. संपूर्ण कथेत आपल्या मिस्किल स्वभावामुळे व विद्यार्थ्यांसाठी स्वतःला झोकून देण्याच्या वृत्तीमुळे वाचकाला हळवे बनवतात व वाचकाशीही एक अनोखं नातं प्रस्थापित करतात. 

            शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाला मिळणारा योग्य आकार, तसेच आवडते शिक्षक शाळेतून जाताच विद्यार्थ्यांचे शिक्षणापासून वंचित राहणे, केवळ शिक्षकापासूनच नव्हे तर शिक्षणापासूनही कायमचे दुरावणे या साऱ्यातून शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील हृद्य नातेसंबंधाचे अतिशय प्रत्ययकारी चित्रण सदर कथांमधून व्यंकटेश माडगूळकर व पु. ल. देशपांडे यांनी रेखाटले व मुळातच अतिशय पवित्र व सन्माननिय समजल्या जाणाऱ्या या नात्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.

संदर्भग्रंथ:

१) माणदेशी माणसे, माडगुळकर व्यंकटेश, कॅन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे, प्र. आ. १९४९.

२) 'अभिरूची' मराठी (ऐच्छिक), शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, जून २०१३


                                      रचना माने

                                     भ्रमणध्वनी- ९४०३८४६२७५

Comments

  1. खूपच छान लेख....💐💐💐

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ग्रामीण कथाकार शंकर पाटील यांना आठवताना….