द. मा. मिरासदारांना आठवताना....

        दत्ताराम मारुती मिरासदार अर्थात द. मा. मिरासदार (१४ एप्रिल १९२७ - २ ऑक्टोबर २०२१) हे मराठी साहित्यक्षेत्रातील प्रसिद्ध विनोदी लेखक, कथाकथनकार, पटकथाकार. विविध कला प्रकारात आपले मोलाचे योगदान देणाऱ्या द. मा. चा जन्म दि. १४ एप्रिल १९२७ रोजी अकलूज येथे झाला. अकलूज, पंढरपूर व पुणे येथे शिक्षण पूर्ण केले. सुरवातीची काही वर्षे पत्रकारिता केल्यानंतर अध्यापनक्षेत्रात प्रवेश केलेल्या द. मा. मिरासदारांनी शिक्षक व पुढे प्राध्यापक म्हणून काम केले.

    १९६२-६३ च्या दरम्यान आपल्या कथाकथनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला अक्षरशः भुरळ घालणारी त्रयी म्हणजे व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार. तीन हजाराहून अधिक प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र जनतेची चांगलेच करमणूक केली. द. मा. मिरासदार यांचे कथाकथन म्हणजे प्रेक्षकांसाठी जणू एक अद्भुत नाट्यानुभव असे. द. मा. मिरासदारांच्या कथाकथनाचे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रासोबतच हैदराबाद, कलकत्ता, इंदोर यासारख्या महाराष्ट्राबाहेरील शहरांमध्ये तसेच कॅनडा-अमेरिका अशा परदेशातही झाले. कथाकथनाप्रमाणे त्यांची विनोदी भाषणे ही प्रेक्षकांना खळखळून हसवणारी असत. 

        मराठीतील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं. वि. जोशी, प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे यांनी जोपासलेली आणि चांगलीच मान्यता प्राप्त करून दिलेली विनोदी लेखनाची परंपरा द. मा. मिरासदारानी पुढे सुरू ठेवली. २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा लिहिणाऱ्या द. मा. मिरासदारांनी 'एक डाव भुताचा' या चित्रपटात कथा-पटकथा लेखनासह हेडमास्तरची भूमिकाही वठवली. त्यांच्या 'व्यंकूची शिकवणी' सारख्या अनेक विनोदी कथा या उत्तम लिखाणा बरोबरच त्याच्या उत्तम सादरीकरणामुळे वाचकांच्या आणि प्रेक्षकांच्या मनात कायमच रुंजी घालत राहिल्या. 

    आपल्या लिखाणातून ग्रामीण जीवनानुभव, ग्रामीण भावविश्व कवेत घेताना त्यांनी मानवी वृत्ती प्रवृत्तीचे विविधांगी असे दर्शन घडविले. आपल्या कथांच्या व त्यातील अनेकविध पात्रांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण लोकांच्या भोळ्या-भाबड्या मनासोबतच विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे, नमुनेदार अशा इरसालपणाचे अतिशय प्रभावी व मार्मिक दर्शन घडविले. म्हणूनच त्यांच्या कथांमध्ये भोळी-भाबडी, टारगट, वाह्यात, बेरकी, अंधश्रद्धाळू, समंजस, जीवनानुभवातून आलेला शहाणपणा वागण्या-बोलण्या उतरलेली अशी नानाविध प्रकारची पात्रे भेटतात. ही पात्रे आपल्या स्वभावनिष्ठ व प्रसंगनिष्ठ विनोदाने एकीकडे वाचकाला खळखळून हसवतात तर दुसरीकडे त्यांच्या जगण्यातील कारुण्य वाचकाला संवेदनशील बनवते. परिणामी त्यांच्या विनोदाला अनेकदा कारुण्याची झालर असल्याचे दिसून येते. पण असे असले तरी त्यांच्या लेखनाचा मूळ पिंड, स्वाभाविक प्रवृत्ती मात्र मिस्किलच असल्याचे दिसून येते. 'मिरासदारी' हा कथासंग्रह म्हणजे द. मा. मिरासदार यांच्या खास विनोदी शैलीतल्या निवडक कथांचा अत्यंत सुरस संग्रह. 

          मराठी ग्रामीण कथेच्या उदयासोबतच ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग असणाऱ्या विनोदाला कवेत घेणारी विनोदी कथा ही जन्माला आली. या विनोदात विविधतेसोबतच एक प्रकारची सहजता होती. मिरासदारांच्या विनोदी कथांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा काही गोष्टी ठळकपणे जाणवतात. त्यांच्या कथांमध्ये एक प्रकारचा मिस्कीलपणा, वृत्तीची चमत्कृती व गमतीदार विक्षिप्तपणाची झलक वाचकाला अनुभवायला मिळाली. हा ग्रामीण विनोदी जीवनानुभव वाचकाचा चांगलाच भावला. मिरासदारांनी अस्सल विनोदी व गावरान पात्रांच्या माध्यमातून स्वभावनिष्ठ व प्रसंगनिष्ठ असा विनोद निर्माण केला. त्यांची ही समंजस, भोळसट, बेरकी, वाह्यात, टारगट, इब्लीस अशा अनेकविध अस्सल वृत्ती -प्रवृत्तीच्या पात्रांनी वाचकाला चांगलेच हसवले, तर कधी कारुण्य टिपून डोळ्यात पाणीही आणले.

      पुणे येथे भरलेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ८३ वर्षांच्या द. मा. मिरासदारांनी सांगितलेली 'भुताची गोष्ट' ऐकताना अवघा मंडप हास्यकल्लोळात बुडून गेला होता. दीड तासाहून अधिक काळ रंगलेल्या या गोष्टीच्या माध्यमातून आवाजातील नाट्यमय असा चढउतार, अस्सल ग्रामीण पात्रे त्यांच्या विविध वृत्ती प्रवृत्तीनुसार डोळ्यासमोर उभे करण्याचे त्यांचे कमालीचे कसब, छोट्या छोट्या प्रसंगातून आणि संवादातून कथा फुलवत नेण्याची त्यांची हातोटी या वयातही जिवंत असल्याचे त्यांनी सिद्ध केले

        अशा या उभ्या महाराष्ट्राला, अवघ्या मराठी जनमाणसाला आपल्या विनोदी लेखणीने आणि कथाकथन शैलीने खळखळून हसायला लावणाऱ्या द. मा. ना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महर्षी वाल्मीकी पुरस्कार, विंदा जीवनगौरव पुरस्कार, ग. दि. माडगूळकर पुरस्कार, अत्रे पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार, गाडगीळ पुरस्कार, चित्रपट संवादलेखनाबद्दल पारितोषिके, पु. ल. जीवनगौरव सन्मान अशा अनेक पुरस्कार- सन्मानांनी गौरवण्यात आले. 

        २०२६-२७ हे द. मा. चे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. या निमित्ताने त्यांच्या काही निवडक कथांच्या माध्यमातून त्यांच्या साहित्यिक योगदानाचा आढावा येथे घेण्याचा मानस आहे. 

हुबेहूब -

          'हुबेहूब' कथासंग्रहातील 'हुबेहूब' या कथेचा नायक बबन स्वभावाने गरीब, सालस, सहज-समंजसपणे जगणारा,  सर्वांशी प्रेमाने वागणारा, कुणाचेही मन न दुखावणारा व मुख्य म्हणजे सर्वांना खळखळून पोट धरून हसवणारा असा आहे. स्वतःच्या कमालीच्या आर्थिक ओढताणग्रस्त जीवनात कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता हातावर मिळतील त्या मोबदल्याच्या बदल्यात लोकांना खळखळून हसवणारा बबन स्वतःचे दुःख मात्र सहज बाजूला सारतो. दुसऱ्यांना खळखळून हसवणाऱ्या बबनचे दुःख मात्र कोणाला दिसत नाही. इतरांना राहू दे पण त्याच्या बायकोलाही त्याचे दुःख दिसत नाही. नकला व विनोदाच्या माध्यमातून दुसऱ्यांच्या जीवनात आनंद पेरणारा बबन स्वतःच्या दुःखाशी, वेदनेशी मात्र एकटाच झुंजत राहतो मग ते दुःख, ती वेदना परिस्थितीनिष्ठ असो किंवा शारीरिक असो. असा हा विंचू चावल्याच्या वेदनाने रात्रभर तडफडत, तळमळत राहणारा बबन वाचकाच्या हृदयाला हात घालतो. 

भुताचा जन्म, घाम, नकटे भूत-

                                       ग्रामीण भागामध्ये दिसून येणाऱ्या असंख्य रूढी-परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा, चालीरीती, सणवार, जत्रा, ग्रामीण भागातील मानसिकता, ग्रामीण भागातील लोकांच्या समजुती, त्यांचे राहणीमान, जीवन संघर्ष या साऱ्याचे विनोदी ढंगाने अतिशय परिणामकारक असे चित्रण द. मा. मिरासदार यांनी आपल्या कथेतून केले आहे. माणूस हा श्रद्धाळू आहे पण बऱ्याच वेळेला विशेषतः ग्रामीण भागात त्या श्रद्धेच्या जोडीला अंधश्रद्धा हातात हात घालून आल्याचे आपणाला दिसून येते. भीतीतून, अज्ञानातून, अजाणतेपणे तर कधी जाणतेपणाने अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या गोष्टी कशा घडतात व या अज्ञानातून, गैरसमजातून, स्वार्थातून, मोठेपणा मिरवण्यातून या अंधश्रद्धांचा जन्म कशा पद्धतीने होतो व या अंधश्रद्धा समाजात कशा बोकाळतात, कशा पद्धतीने सर्वदूर पसरतात व फोफावतात, काही धूर्त लोक त्याचा फायदा घेऊन देवाचा कोप वगैरे गोष्टी सांगून लोकांना घाबरवून स्वतःची पोळी कशी भाजून घेतात तर काही स्वतःची मर्दुमकी गाजवण्यासाठी भुतासोबत केलेल्या झटपटींच्या, भुताला लोळवळ्याच्या बाता कशा मारतात  आणि अशा या खतपाणी घालण्याने ग्रामीण समाजात अंधश्रद्धा आणखीनच कशा वाढीस लागतात याचे विनोदी ढंगाने अतिशय यथार्थ असे चित्रण भुताचा जन्म, घाम, नकटे भूत या कथांमध्ये आले आहे.

जोडी-

     शेतीचं यांत्रिकीकरण होण्याच्या अगोदरच्या काळात जनावरे हा बहुधा सर्व शेतकऱ्यांच्या शेतकामाचा पर्यायाने घराचा अन् आयुष्याचाही अविभाज्य भाग होती. दूध-दुभत्याच्या माध्यमातून घर संसाराला हातभार लावणारी तसेच शेतकामांमध्ये मदत करणारी ही जनावरे शेतकऱ्याच्या कुटुंबाचाच हिस्सा. एखाद्या हाडामासाच्या माणसाला जीव लावावा तसा त्याचा जनावरांवर जीव. त्या जनावराचा देखील आपल्या मालकावर तितकाच जीव. पण एखाद्या अडीअडचणीच्या वेळी या जनावरांना विकण्याची वेळ शेतकऱ्यावरती येते त्यावेळेला जनावरे स्वतःपासून दूर जाणार म्हणून त्यांच्या मनाची होणारी घालमेल, कसंही करून त्यांना विकून केवळ आपली अडचण भागवणे या स्वार्थी विचाराऐवजी ती ज्या नव्या घरात, नव्या लोकांच्यात जाणार तिथे त्यांना नेमकी कशी वागणूक मिळणार, तिथे त्यांना घडीभर विसावा मिळणार  की त्या मूक जनावरांकडून ढोरकष्टच करून घेतले जाणार, त्यांना जीव लावला जाणार की फक्त व्यावहारिक दृष्टिकोनातून त्यांचा वापरच केला जाणार याचा सारासार विचार करूनच सौदा करण्याची किंवा प्रसंगी केलेला सौदादेखील मोडण्याची मानसिकता इथे दिसून येते. फक्त आपली अडचण दूर झाली म्हणजे बास झाले त्या जनावराचं काहीही होऊ दे त्याच्याशी आपल्याला काहीही पडलेले नाही असा कोरडा आणि व्यावहारिक विचार हे शेतकरी करत नाहीत. कमालीच्या अडचणीच्या प्रसंगात देखील आपल्या जनावराप्रती कमालीच्या संवेदनशील व भावनाशील असणाऱ्या शेतकरी बाप-लेकाचे चित्रण 'जोडी' या कथेत द. मा. नी केले आहे. 

      जनावरांवर जीव असणारा पण आयुष्याचे पावसाळे बघितल्यामुळे थोडा व्यावहारिक विचार करणारा तात्या गरजेपाई घरातील बैलाची जोडी विकायचा निर्णय घेतो. व आपला मुलगा भगवानसोबत बैलजोडी घेऊन तो बाजारात येतो. पण ती जन्मल्यापासूनच त्याच्या सवयीची असलेल्या व त्यांच्यावर प्रचंड जीव असणाऱ्या  भगवानला मात्र या बैलजोडीला विकायचे जीवावर येते. नाखुशीनेच तो सोबत येतो. सदर निर्णयाबाबतची त्याची नाखुशी, त्याची नाराजगी, त्याच्या मनाची घालमेल जाणलेला तात्या गरजेपोटी घेतलेल्या या निर्णयापाठीमागची निकड पुन्हा एकदा समजावून सांगतात. बैलजोडी विकण्याच्या अपरिहार्यतेची जाणीव असलेला भगवान नाईलाजानेच काळजावरती जणू दगड ठेवून एका गिर्‍हाईकाबरोबर व्यवहार पक्का करतो. तात्या बोलता बोलता अगदी सहजतेने, नकळतपणे विकत घेणाऱ्या शेतकऱ्याची मानसिकता, त्यांना विकत घेण्याऱ्याची भूमिका, त्याच्या सवयी या सगळ्या गोष्टी तो जाणून घेतो आणि मग कुठल्याही प्रकारचं बिडी, तंबाखूचं व्यसन नसणाऱ्या या नवीन मालकामुळे काम करताना दोन घटका विसावासुद्धा आपल्या बैलांच्या वाट्याला येणार नाही, प्रचंड व्यावहारिक विचार करणाऱ्या या नव्या मालकामुळे आपल्या जनावरांचे खूप हाल होतील या जाणिवेने, आपल्या बैलांप्रती संवेदनशील झालेला तो शेतकरी आपली अडचण बाजूला सारून ठरला व्यवहार मोडतो. यातून एका शेतकऱ्याचे आपल्या मूक जनावरावरती किती नितांत प्रेम असते याचे अतिशय हृदयस्पर्शी चित्रण म्हणजे द. मा. ची जोडी ही कथा होय.

      आपल्या मूक जनावरावरती शेतकऱ्याचे असणारे जीवापाड प्रेम, पोटच्या पोराप्रमाणे त्यांचा केलेला सांभाळ, अगदी अडचणीच्या वेळेला त्या जनावरांना विकायची वेळ येतात त्याच्या मनाची होणारी घालमेल, मनावरती दगड ठेवून जनावरे विकण्याचा घेतलेला निर्णय, पण तो निर्णय घेतानासुद्धा नव्या ठिकाणी आपल्या जनावरांचे आबाळ तर होणार नाहीत ना? त्यांच्याकडून ढोरासारखं काम करून घेणार नाही ना? याची आडून आडून केलेली चौकशी, नवीन मालकाला पानसुपारी, तंबाखू, विडी याचं कसलंही व्यसन नसल्याने आपल्या जनावराला थोडासुद्धा विसावा मिळणार नाही या जाणिवेने आपली अडचण बाजूला सारून झालेला सौदा मोडणारा मालक, आपल्या जनावरा वरती असणारे त्याचे हृद्य प्रेम याचे अत्यंत हृदयस्पर्शी असे चित्रण द. मा. मिरासदार यांनी 'जोडी' या कथेत केले आहे. 

तगई -

         आपल्याकडे फार जुनी म्हण आहे, 'सरकारी काम आणि सहा महिने थांब.' भ्रष्टाचाराने पोकळलेल्या या व्यवस्थेत पैसे चारल्याशिवाय कुठलेही काम होत नाही. पैशाचे वजन ठेवल्याशिवाय कुठलाही कागद, कुठलीही फाईल पुढे सरकत नाही. विशेषत: सरकारी कार्यालयांमधून अनुभवास येणाऱ्या या सार्वत्रिक अनुभवावर द. मा. मिरासदार यांनी आपल्या 'तगई' या कथेच्या माध्यमातून अतिशय वास्तवदर्शी प्रकाश टाकला आहे. अण्णा भागवत या वरून दिसायला बावळट असणाऱ्या पण अतिशय बेरकी, हुशार, ठकास महाठक असणाऱ्या व्यक्तीने सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराचा अगदी साळसूदपणे फाडलेला बुरखा, केलेली पोलखोल, या भ्रष्टाचारी व्यवस्थेला दिलेली सणसणीत चपराक व या बरबटलेल्या व्यवस्थेला जरासुद्धा बळी न पडता, भीक न घालता सरकारकडून आलेली तगईची सगळीच्या सगळी रक्कम अतिशय पद्धतशीरपणे, अतिशय चालाखपणे स्वतःच्या पदरात पाडून घेण्याचे त्याचे कसब अतिशय सुंदर पद्धतीने द. मा. मिरासदार यांनी 'तगई' या कथेत वर्णिले आहे. पण हे करताना कळत नकळत या व्यवस्थेचा भाग बनलेल्या गरीब झाडूवाल्याच्या नोकरीवरती काही गदा येऊ नये म्हणून मामलेदारासमोर त्याचा नामोल्लेख टाळून, त्याला या सगळ्या पैशांच्या वसुलीपासून दूर ठेऊन तो स्वतःतील माणुसकीचे दर्शन घडवितो.

साक्षीदार-

         छोट्या-मोठ्या कारणांसाठी प्रॉपर्टीच्या हव्यासापोटी कोर्टाच्या पायऱ्या चढणारी माणसं, कोर्टकचेरी कामात, न्यायदानाच्या प्रक्रियेत साक्षीदाराला असणारे महत्त्व, सर्रासपणे दिल्या जाणाऱ्या खोट्या साक्षी याचे अतिशय प्रभावी असे चित्रण साक्षीदार या कथेत वरून बावळट दिसणाऱ्या पण अनेक खटल्यांमध्ये प्रमुख साक्षीदार बनून पैसे घेऊन खोट्या साक्षी अतिशय सफाईदारपणे देण्यात तरबेज असणाऱ्या, हाच धंदा असलेल्या दिगंबर शंकर दंडवते याच्या माध्यमातून लेखकाने घडवले आहे. एकूणच न्यायदानाच्या प्रक्रियेतील ही अतिशय काळी बाजू लेखकाने अतिशय प्रभावीपणे उघड केली आहे. 

जेवणवेळ -

        पक्ष्यांचे नाना प्रकारचे मंजूळ आवाज ऐकत, ओढ्याकडून येणाऱ्या सुखद गार वाऱ्याची झळ अंगावर घेत, संथ निळेशार आरशासारखे चमकणारे पाणी बघत,  वाऱ्याने डुलणारे काठावरचे गवत बघत, आपल्या आवडत्या ठिकाणी म्हणजेच ओढ्याकाठच्या लिंबाखाली निवांत बसून शिदोरी खाणे हा कथानायक असणाऱ्या आबाचा नित्यक्रम. ओढ्याच्या कडेने गेलेल्या नागमोडी पायवाटेवरून येणा-जाणाऱ्या गाड्यांकडे बघणे, पायी जाणाऱ्या वाटसरूला हाळी देणे, त्याच्याशी आपुलकीने बोलणे, त्याची चौकशी करणे, न विचारता त्याला सल्ला देणे, तो घटकाभर बसलाच तर त्याला आग्रहाने आपल्यातला भाकरी तुकडा खाऊ घालणे, सुखदुःखाच्या गोष्टी करणे, अनुभवाचे चार सल्ले देणे या साऱ्यामुळे तो वाटसरूही खुश होई व त्याचा आनंद बघून आपण कुणाचंतरी भलं केलं याचं आबालाही समाधान होई. 

      नको म्हणून सांगून देखील बायको माहेरी गेली म्हणून चिडून तिला मारायला निघालेल्या, रागाने बेफान झालेल्या बजरंगला आबा गोड बोलून घटकाभर बसवून घेऊन, त्याला भाकरी-तुकडा खायला लावून हळूहळू त्याचा राग शांत करणाऱ्या व ती माहेरी गेली यात तिचं काहीही चुकलं नाही, वल्ली बाळंतीण असणाऱ्या आपल्या आईच्या मदतीला तिचे जाणं भाग होतं हे त्याला समजावून सांगतो आणि आपण खूप मोठा तंटा होण्याअगोदर शांत केला या विचाराने समाधानी होतो. भाबड्या आबाला आपण रोज या लिंबाखाली जेवायला बसतो, चार माणसे भेटतात, कितीतरी चांगल्या गोष्टी घडतात, वाईट गोष्टी टळतात हे सगळं आपल्यामुळे होतं, आपण इथे बसतो त्यामुळे होतं या मानसिक समाधानात जीवन जगणाऱ्या भाबड्या आबाचे चित्रण 'जेवणवेळ' या कथेत लेखकाने अतिशय प्रभावीपणे केले आहे. 

एक सुक्या न्हावी ह्याची गोष्ट -

                                    लोकांकडून, गिऱ्हाईकडून गोड बोलून पैसे उसने घेणाऱ्या पण काय वाट्टेल ते झालं तरी, प्रसंगी त्यांच्या कडून अख्या गावासमोर धुलाई करून स्वतःची पत घालवून घेणाऱ्या पण काय वाट्टेल ते झालं तरी घेतलेले पैसे कधीही परत न करणाऱ्या अतिशय धूर्त, बेरकी आणि कमालीच्या निर्लज्ज अशा सुक्या न्हाव्याची कथा मोठ्या वैशिष्ट्यपूर्णरित्या येथे द. मा. नी सांगितली आहे. 

टांक -

     तल्लख बुद्धीचा पण आळशी, कामचुकार, धूर्त, लबाड अशा बादशाह सोनारचे चित्रण टांक या कथेत द. मा. नी अतिशय प्रभावीपणे आहे. त्याचा पोटापाण्याचा व्यवसाय असलेला घरचा सोनार कामाचा धंदा यात सुद्धा त्याच्या या वृत्तीची झलक पडत असल्याने चांगले गिऱ्हाईक त्याच्याकडे कधी चुकूनही फिरकत नसे. परिणामतः त्याचा धंदा व्यवस्थित चालत नसल्याने व त्याचे त्याला काहीच वाटत नसल्याने त्याच्या कुटुंबाची वेळोवेळी चांगलीच आबाळ होत. पण त्याच्यावरती या साऱ्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नसे. त्याच्या या कारनाम्यांमुळे तो चांगलाच कुप्रसिद्ध होता. त्याच्या या कारनाम्यांबद्दल ऐकूण असणाऱ्या गिऱ्हाईक म्हातारीला तो स्वतःची खोटी ओळख सांगतो व तिच्याकडून वेगवेगळ्या देवांचे खूप सारे टाक बनवण्याचे काम घेतो. पण त्याच्याकडे फक्त खंडोबाचा टाक बनवण्याचा साचा असल्यामुळे त्याची चांगलीच पंचायत होते. त्याच्या कारनाम्यांमुळे त्याला इतर सोनारांकडून साचे मिळण्याची शक्यतासुद्धा कमी असते. तेव्हा हा धूर्त सोनार स्वतःजवळ असणाऱ्या खंडोबाच्या एकाच साच्यात सर्व टाक बनवतो व म्हातारीला स्वप्नात प्रत्येक देवाने आपणालासुद्धा घोडा हवा असा हट्ट धरल्याने आपण असे प्रत्येक देवाचे घोड्यावर बसलेले टांक बनवले असे सांगून अतिशय बेमालुमपणे फसवतो. स्वप्नांवर विश्वास ठेवणारी म्हातारी त्याच्यावर खुश होऊन ठरल्या मजुरीपेक्षा जास्त मजुरी त्याच्या हातावर ठेवते. अशा या अतिशय बेरकी, धूर्त, चैनीबाज, कामचुकार,  गिऱ्हाईकाला हातोहात फसवणाऱ्या बादशहा सोनाराचे चित्रण अतिशय मार्मिकपणे टांक या कथेत द. मा.  मिरासदारांनी केले आहे.

       द. मा. मिरासदार यांच्या लेखनवैशिष्ट्यांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा लक्षात येते की द. मा. मिरासदारांच्या कथांचे कथानक अतिशय साधे, सोपे, सहज असते. आजूबाजूला घडणारे प्रसंग, आजूबाजूला भेटणारी पात्रे या साऱ्यांना त्यांनी कथाविषय बनवले. पत्रांची शरीरयष्टी, पेहराव यांचे बारकाईने चित्रण   करण्यापेक्षा पात्रांच्या वर्तनविशेषातून, वृत्ती विशेषासह ते पात्र वाचकाच्या डोळ्यासमोर उभे करतात. त्यांची पात्रे स्वतःच्या गुणवैशिष्ट्यांसह, स्वभाव वैशिष्ट्यांसह कथेत येतात. तसेच आपल्या कथांमधून वाचकाला ते उपदेशाचे डोस पाजत नाहीत.

       ग्रामीण माणूस म्हणजे केवळ चांगलाच, साधा, भोळा, कुणालाही न फसवणारा असा भाबडा किंवा एककल्ली विचार त्यांची लेखणी स्वीकारत नाही. त्यांनी स्वीकारलेला ग्रामीण माणूस आपल्या सहज-स्वाभाविक, चांगल्या-वाईट अशा वृत्ती-प्रवृत्तींनिशी आकाराला येतो. ना नसते आदर्शत्वाचे, ना वाह्यात विनोदाचे कसलेच पूट ते त्याला चिकटवत नाहीत. तो जसा आहे तसा आपल्या नैसर्गिक वृत्ती-प्रवृत्तींनिशी रेखाटतात. 

         ग्रामीण जीवनातील विसंगती टिपणारी त्यांची कथा मानवी स्वभावातील, परिस्थितीतील, माणसा-माणसांच्या विचार-वर्तनातील विसंगती टिपते. 'शाळेतील समारंभ' सारख्या कथेत विसंगतीला अतिशयोक्तीची जोड दिली आहे आणि त्यातून विनोद साकारला आहे. 

         द. मा. मिरासदारांच्या लेखनशैलीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा लक्षात येते अस्सल ग्रामीण बोलीभाषेचा सहज वापर, प्रसंगनिष्ठ व स्वभावनिष्ठ विनोद, जिवंत व्यक्तिरेखा, उपहासात्मक शैली, मनोरंजनातून सामाजिक वास्तवाचे अधोरेखन यासारखी काही ठळक वैशिष्ट्ये दिसून येतात. दृश्यात्मकता हे त्यांच्या निवेदनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. त्यांची कथा वाचकांच्या डोळ्यासमोर उभी राहते. आटोशीरपणा, नेमकेपणा व  गतिमानता हे त्यांच्या निवेदनाचे, भाषशैलीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य. त्यांची कथा कुठेही रेंगाळत नाही. परिणामतः ती कंटाळवाणी होत नाही. साध्याशाच विषयाची, प्रसंगाची, साधी-सुलभ मांडणी, साधी-सोपीच भाषा, त्यामुळे त्यांची कथा वाचकाला सहजतेने समजते व तितक्याच सहजतेने ती त्यांच्या चेहऱ्यावर निखळ आनंद आणते. एकंदरीत ग्रामीण जीवनाचे अतिशय वास्तववादी चित्रण द. मा. मिरासदार यांनी आपल्या कथांमधून केले आहे.   


                                            रचना माने, कोल्हापूर 

                                          संपर्क - ९४०३८४६२७५


Comments

Popular posts from this blog

ग्रामीण कथाकार शंकर पाटील यांना आठवताना….