अपघात? हा तर 'सखी'चा घात..!
'विवाह' हिंदू संस्कृतीतील सर्वात पवित्र संस्कार ! हृदयात मांगल्य निर्माण करणारे ते मंगलमय वातावरण... आप्तेष्टांकडून पडलेल्या त्या शुभेच्छारुपी अक्षदा... पवित्र अशा अग्नीभोवती देवाच्या साक्षीने घेतलेले सात फेरे... सप्तपदी चालताना हातात हात घालून केवळ सातच जन्मांच्या नव्हे तर जन्मोजन्मीच्या सोबतीच्या मनोमनी घेतलेल्या त्या निःशब्द आणाभाका... सप्तपदीतील प्रत्येक पावलाला निष्ठा, प्रेम, सचोटीचं दिलेलं वचन...
सात फेऱ्यांपासून सुरु झालेला दोघांचा संसार... शब्दांच्या, भावनांच्या, नजरेच्या, विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाला समजून घेण्यातून दिवसागणिक अधिकाधिक दृढ होत गेलेलं दोघांचं पारदर्शी नातं... तिला सारी सुखं देण्यासाठी धडपडणारा तो आणि त्याच्यातच सारं विश्व सीमित आलेली ती... एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते जणू 'made the each other....'कालांतराने त्यांच्या संसारवेलीवर एखादं फुलं उमलतं आणि त्यांना जोडणारी एक कडी निर्माण होते. दुर्दैवाने या वेलीवर जर फूल उमललं नाही तर त्यांचे नाते अधिकच दृढ होते. मनाच्या त्या दुखऱ्या बाजूवर हळूवार फुंकर घालताना ते दोघे एकमेकांना जास्तच जपू लागतात. पाहणाऱ्यांन हेवा करावा असं त्यांचं प्रेम. आणि एक दिवस...
प्रेमरूपी अवकाशात विश्वासरुपी पंखांच्या बळावर उंच भराऱ्या घेत असतानाच नियतीरुपी क्रूर पारध्याने एका पक्षाचा साधलेला अचूक वेध... सोबती अचानक निघून गेल्याने सैरभैर आलेले ते एकाकी पाखरु... पंख असूनही पंख छाटलेल्या पाखराप्रमाणे त्याचं तडफडणं...
चाललेले ते सात फेरे... प्रत्येक फेऱ्याबरोबर निष्ठा, प्रेम, सचोटी व आयुष्यभराच्या सोबतीचं घेतलेलं ते वचन... सारं काही मंगळसुत्राशिवाय अर्थहीन होऊन विरुन जातं. विवाह, प्रेम, संसार, नाती, स्वप्नं सारं काही कुंकवासोबत पुसून जातं... आणि उरतं एक भयाण एकाकीपण...!
पण या साऱ्याला जबाबदार कोण? नियती? की आणखी कोणी? बेमुर्वत मग्रुरी व व्यावसायिक स्पर्धा यामुळे स्वत:च्या धुंदीत बेफामपणे वाहने चालवणाऱ्या वाहन चालकांमुळे प्राणास मुकलेल्या निष्पापांच्या मृत्यूला त्या नियतीला जबाबदार धरणे कितपत योग्य आहे? माणसाच्या अक्षम्य चुकांचे खापर नियतीवर फोडून माणसांनी केलेल्या चुका क्षम्य होणार आहेत? चुका? अरे हे तर अघोरी पाप आहे. प्रेमाच्या अवकाशात स्वच्छंद भरारी घेणाऱ्या त्या दोघांपैकी एकाचा आपल्या हलगर्जीपणाने बळी घ्यायचा यासारखे अघोरी पाप ते कोणते? पण या पापाची फळं भोगावी लागतात मात्र निष्पापांना... तिचं आयुष्य तर पूर्णपणे उद्ध्वस्थ होतंच... पण त्याच्याशी रक्ताच्या, मैत्रीच्या, प्रेमाच्या नात्यांनी बांधल्या गेलेल्या त्याच्या जिव्हाळ्याच्या माणसांचेही सारे जीवन अंधारमय होते.
तिच्या प्रत्येक श्वासात सामावलेला तो... तिचे डोळे भिर-भिरताहेत... माणसांच्या गर्दीत... दूरपर्यंत फक्त त्याचाच ठाव घेताहेत. आज पाण्याने डबडबलेल्या, उद्या कदाचीत वाट पाहून पाहून पूर्णपणे कोरडे पडलेल्या त्या डोळ्यांचा शोध कधी संपेल? तिचा जन्मो-जन्मीचा सोबती तिला पुन्हा कधी सापडेल? तिच्या प्रेमाचा 'दीप' पुन्हा उजळेल? त्याच्या हातात हात घालून पुन्हा कधी तिला आयुष्याचा प्रवास करता येईल? आयुष्याचा प्रवास तर करावाच लागणार आहे. त्याच्यासोबत नव्हे तर त्याच्या आठवणींसोबत.
तो तर गेला. पण त्या वचनांचं काय जी त्यानं तिला दिली. त्या स्वप्नांचं काय जी त्या दोघांनी मिळून पाहिलीत. आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून तिच्या गळ्यात बांधलेलं ते मंगळसुत्र, सर्वाच्या साक्षीनं तिला आपली बनवताना तिच्या भांगात भरलेलं कुंकू, उभ्या जन्माची सोबत म्हणून तिच्या सोबत घेतलेले ते सात फेरे, तिला सोडून जाताना या साऱ्याची क्षणभर तरी आठवण त्याला झाली असेल? क्षणभरही आपल्याशिवाय न राहणारी ती उभं आयुष्य आपल्याशिवाय कशी काढेल याची जाणीव त्याला झाली नसेल? क्षणार्धात तिला कायमचं एकटे सोडून जाताना आयुष्यभराच्या सोबतीचं तिला दिलेलं वचन त्याला आठवलं नसेल?
आणि म्हणूनच क्षणार्धात होत्याचं नव्हतं करणाऱ्या, तिचे सारे आयुष्य उद्ध्वस्थ करणाऱ्या, अंधारमय करणाऱ्या, क्षणोक्षणी हजारो मरणे देणाऱ्या या घटनेला केवळ 'अपघात' म्हणायचे का? म्हणूनच वाटते हा अपघात नव्हे हा तर 'सखी'चा 'घात'..!
डॉ. रचना माने, कोल्हापूर

Excellent 👌 👌👌
ReplyDelete💐💐💐
ReplyDeleteहृदयस्पर्शी....
ReplyDelete